Restructuring of GST Rates: सामान्य माणसाच्या डोक्यावरील कराचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार असून दैनंदिन वापरातील काही वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार मध्यम आणि निम्न मध्यम वर्गीयांच्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी कमी करू इच्छिते. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर टुथपेस्ट पासून ते किचनमध्ये लागणाऱ्या छोट्या-मोठ्या वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात. यातील बहुतेक वस्तूंवर सध्या १२ टक्के कर लागतो. हा कर कमी करून सरकार पाच टक्क्यावंर आणू शकते.

जीएसटी परिषदेची बैठक लवकरच होणार असून यात जीएसटीच्या दर पुनर्रचनेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. फायनान्शियल एक्सप्रेसला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच एक विशेष मुलाखत दिली. यात त्यांनी जीएसटी दर कमी होणार असल्याचे सुतोवाच केले.

जीएसटी दरांची पुनर्रचना

या मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीचे दर कमी होतील, असे सांगितले. “आम्ही त्यावर काम करत आहोत. दर कमी केल्यास महसुलात वाढ होईल”, असेही त्या म्हणाल्या. बहुप्रतिक्षित अशा जीएसटीच्या ५६ व्या परिषदेच्या तारखा अद्याप जाहिर झालेल्या नाहीत. जुलैच्या सुरुवातीला ही बैठक होण्याची अपेक्षा आहे.

सध्याच्या जीएसटी रचनेत ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार कराच्या श्रेणी आहेत. सध्याच्या रचनेत ५ टक्क्यांच्या श्रेणीत जीएसटीमधील २१ टक्के वस्तू आहेत. १२ टक्क्यांच्या श्रेणीत १९ टक्के वस्तू, तर १८ टक्क्यांच्या श्रेणीत ४४ टक्के आणि २८ टक्के या सर्वोच्च श्रेणीत ३ टक्के वस्तू समाविष्ट आहेत.

कोणत्या वस्तूंवरील जीएसटी कमी होऊ शकतो

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, १२ टक्के असलेली श्रेणी बंद करून त्यातील वस्तू पाच टक्क्यांच्या श्रेणीत आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. असे केल्यास या श्रेणीतील वस्तू जसे की, चप्पल, बूट, मिठाइ, कपडे, साबण, टुथपेस्ट आणि डेअरी प्रॉडक्ट्स सारख्या वस्तू स्वस्त होऊ शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच पनीर, खजूर, सुका मेवा, पास्ता, जॅम, ज्यूस, फरसान, छत्री, टोपी, सायकल, लाकडी फर्निचर, पेन्सिल अशा वस्तूही स्वस्त होणार असल्याचे सांगितले जात आहे.