Gurugram Overtakes Mumbai in Luxury Home Sales 2025: भारताच्या आलिशान घरांच्या विक्रीमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुग्राम २०२५ मध्ये १० कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या आलीशान घरांच्या विक्री मूल्याच्या बाबतीत मुंबईला मागे टाकत देशातील सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.
इंडिया सोथेबीज इंटरनॅशनल रिअॅलिटी आणि सीआरई मॅट्रिक्सच्या नवीन हाय-एंड लक्झरी गृहनिर्माण अहवालानुसार, २०२५ कॅलेंडर वर्षात १० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे गुरुग्राममध्ये २४,१२० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
२०२५ मध्ये मुंबईत १० कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या २१,९०२ कोटी रुपयांची आलिशान घरांची विक्री झाली आहे.
२३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात असे दिसून आले आहे की, २०२५ मध्ये गुरुग्राममध्ये १० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची १,४९४ घरे विकली गेली, जी शहरातील १२ महिन्यांच्या कालावधीतील आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.
गुरुग्राममध्ये २०२३ मध्ये १० कोटी किंवा त्याहून अधिक किमतीच्या १५५ घरांची विक्री झाली होती. त्यानंतर आता जवळजवळ दहापट वाढ झाली आहे, ज्यामुळे संपत्ती निर्मितीचा वेग आणि उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या ग्राहकांचा वाढता सहभाग अधोरेखित होतो, असे त्यात म्हटले आहे.
१० कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या आलिशान घरांच्या विक्रीच्या बाबतीत गुरुग्राम आणि मुंबईनंतर नोएडा आणि ग्रेटर नोएडा यांचा क्रमांक लागतो.
नोएडा आणि ग्रेटर नोएडा या दोन्ही शहरांनी एकत्रितपणे २०२५ मध्ये आलिशान घरांच्या श्रेणीत ९,३५८ कोटी रुपयांची घरे विकली आहेत. २०२५ मध्ये हैदराबाद आणि बंगळुरूने आलिशान घरांच्या श्रेणीमध्ये अनुक्रमे ८,१४० कोटी रुपये आणि २,३१९ कोटी रुपयांची घरे विकली आहेत.
संपत्ती निर्मितीमुळे लक्झरी घरांच्या मागणीला चालना
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्झरी घरांच्या मागणीतील तेजीचा संबंध भांडवल निर्मिती आणि उद्योजकीय संपत्तीशी जोडला आहे. केवळ २०२५ मध्ये, १०३ भारतीय कंपन्यांनी मेनबोर्ड आयपीओद्वारे विक्रमी १९.५४ अब्ज डॉलर्स उभारले, ज्यामुळे आलिशान घरांची खरेदी करणाऱ्या संस्थापक आणि प्रवर्तकांचा एक नवीन ग्राहक वर्ग तयार झाला आहे.
सीआरई मॅट्रिक्सचे सह-संस्थापक आणि सीईओ अभिषेक किरण गुप्ता म्हणाले की, खरेदीदार प्राइम लोकेशन्स, बांधकाम गुणवत्ता आणि ब्रँडेड सुविधांनी समृद्ध प्रकल्पांना प्राधान्य देत आहेत.
