आशीष थत्ते
Half CA Web Series Financial Concepts :
शीर्षकामध्येच अर्थ दडलेले असल्याने वेबसिरीजमध्ये अर्थविषयक उल्लेख आढळणे स्वाभाविक आहे. चार्टर्ड अकाउंटन्सीचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची काय भावनिक अवस्था असते ते दाखवतानाच सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट-सीए) काय काम करतात ते सुद्धा या सिरीजमध्ये दाखवले आहे. पहिल्याच भागात एका माणसाला अग्रीम करातून कशी सवलत मिळू शकते आणि ते करताना नायिकेच्या मनावर परिणाम होतो आणि ती अभ्यासाला गंभीरपणे घेऊ लागते. अग्रीम करांचे नियम सांगतात की, तुमचे काही उत्पन्न झाले की, अग्रीम कर जमा करावा पण त्यातून ज्येष्ठ नागरिकांना अटी-शर्थी पाळल्यास सवलत मिळते.

नवीन प्राप्तिकर कायद्यात कलम ४०३ मध्ये ही सवलत आहे तर वेबसीरिजमध्ये दाखवल्याप्रमाणे जुन्या कायद्यात कलाम २०८ मध्ये ही सवलत दिली आहे. सीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या अशा सवलती तोंडपाठ असणे अपेक्षित असते, पण रंजकता यावी म्हणून त्याचा वापर अतिशय खुबीने केला आहे.

पैसे वाचवणे म्हणजेच कमावणे…

दुसऱ्या भागाचे नावच अप्रत्यक्ष खर्च असल्यामुळे काही खर्चांची चर्चा केली आहे. रोजच्या जीवनात खर्चाचा विचार करतानाच वेळ सुद्धा एक प्रकारचा खर्च असतो हे काही उदाहरणातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोचिंग क्लासचे शिक्षक फक्त जीवनाचे नाही तर उद्योगातील सुद्धा एक अतिशय महत्त्वाचे तत्व सांगतात ते म्हणजे पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमावणे. त्यांनी जरी रोजच्या जीवनातील काही उदाहरणे दिली असली तरी उद्योगात नेहमी कमी खर्चाचे पर्याय शोधले जातात जसे की, त्याच वस्तू कमी भावात देणारे पुरवठादार, कमी व्याजात कर्ज देणारे पर्याय इत्यादी. म्हणूनच ७ टक्के हमखास सवलत देणाऱ्या मोठ्या दुकानांमध्ये नेहमीच गर्दी असते, हल्लीचे केमिस्टसुद्धा छापील किमतीवर सूट देतात. उद्योगातील अप्रत्यक्ष खर्च जे वस्तू बनवताना लागत नाहीत पण तरीही त्यांच्या शिवाय वस्तू बनत देखील नाहीत जसे की, विजेचा खर्च किंवा जागेचे भाडे इत्यादी. शिक्षक हे सांगताना जीवनात आपण अभ्यासाला दिलेला वेळ प्रत्यक्ष खर्च तर आपण सोडलेले आरामदायी जीवन हा अप्रत्यक्ष खर्च असल्याचे नमूद करतात. असा खर्च केल्यानंतर जे चांगले उत्पादन मिळते ते म्हणजे तुम्ही परीक्षा पास होऊन ‘सीए’ होता. आर्ची म्हणजे वेबसिरीजची नायिका रिक्षाचा प्रवास सोडून लोकल ट्रेनने रोज क्लासला यायला तयार होते. उद्योगातील अप्रत्यक्ष खर्च ही संकल्पना येथे वित्तरंजक म्हणून वापरली आहे.

सुभाष चंद्रा यांचे सुमारे २२ हजार कोटींचे प्रकरण काय?

तिसरा भाग निर्लेखित करणे म्हणजे ‘राईट-ऑफ’ या विषयावर आहे. हल्ली हा विषय जरा जास्तच चर्चेत आहे कारण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने सुभाष चंद्रा यांचे सुमारे २२ हजार कोटींचे कर्ज निर्लेखित करून अवघे ६ कोटी रुपयांची थकबाकी दाखवली आहे. इकडे निर्लेखित करणे हे कुठल्या कंपनी विषयी नसून आयुष्यात काही गोष्टी निर्लेखित कराव्या लागतात असे सांगितले आहे. नायिकेचा मित्र चक्क ‘सीए’चा अभ्यासक्रम निर्लेखित करतो आणि आपले नाटकातील कारकीर्द पुढे घेऊन जातो. दुसरीकडे ज्या वरिष्ठाचा सल्ला नायिका घेत असते तो सुद्धा आपल्या कंपनीला राम राम ठोकून ‘सीए फायनल’ परीक्षेच्या तयारीला लागतो. भागाच्या शेवटी निर्लेखित करण्याचे महत्त्व सांगितले आहे. निर्लेखित करणे म्हणजे नुकसान असे सगळ्यांनाच वाटते पण तसे नसून एखादी गोष्ट बंद करून नवीन सुरू करणे असा त्याचा अर्थ होतो. आयुष्यात योग्य वेळेला विचलित करणाऱ्या गोष्टी ओळखून त्यांना तिथेच थांबवणे आणि नवीन गोष्टींना सुरू करणे असा त्याचा अर्थ असल्याचे नायिका सांगते. संदर्भ जरी ‘सीए’च्या परीक्षेचे असले तरी बऱ्याच वेळेला ‘कॉस्ट अकाऊंटिंग’चा उल्लेख केलेला आढळतो. भागाच्या शेवटी सेवा क्षेत्रात गरज असणारी कार्य आधारित परिव्यय पद्धतीचा उल्लेख होतो जी आपल्याकडे अभावानेच वापरली जाते. हॉस्पिटल्स, विमान वाहतूक, बँका, पंचतारांकित हॉटेल्समध्ये ही पद्धत प्रभावीपणे वापरली जाऊ शकते.

पुढील भाग तसा ‘सीए’ परीक्षेच्या पद्धतीवर जास्त चर्चा होते. इतरही काही चित्रपट किंवा वेबसिरीज भारतीय प्रशासन सेवांवर आलेल्या आहेत पण परीक्षा पद्धतीची चर्चा किंवा त्यातील उत्तीर्ण होण्याच्या अटी अश्या सूक्ष्म तपशिलांची कुठे नोंद होत नाही.

पुढच्या आणि शेवटच्या भागाच्या सुरुवातीलाच दोन विद्यार्थ्यांच्यामध्ये ‘स्मॉल कंपनी’चा कंपनी कायद्याच्या अनुषंगाने विचारविनिमय होते. सध्या सुद्धा हा विषय चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे कंपनी कायद्यामध्ये मागील वर्षी झालेले बदल. १ डिसेंबर २०२५ रोजी कलम २(८५) मध्ये बदल करून ज्या कंपन्यांचे भागभरणा झालेले भांडवल ४० कोटींपेक्षा कमी आहे आणि वार्षिक उलाढाल १०० कोटींपेक्षा कमी आहे त्यांना ‘स्मॉल कंपनी’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या कंपन्यांना अनुपालनाचा भार कमी ठेवला आहे. यातील तरतुदी इथे संवादात वापरण्यात आल्या आहेत. पुढच्याच दृश्यात आर्चीचा वडिलांच्या पूजा सामग्रीच्या दुकानात एका गिऱ्हाईकाला खरेदी केलेल्या वस्तूंवर वस्तू व सेवा कराचा परतावा घेऊन पैसे वाचवण्याबद्दल सांगतो. वित्तीय क्षेत्रातील जाणकार माणसे अशा पद्धतीने तुम्हाला कर नियोजन करण्यास मदत करू शकतात. या भागाचे नाव ताळेबंद म्हणजे ‘बॅलन्स शीट’ असल्याने रंजकता वाढवण्यासाठी आर्चीचा परीक्षेत ताळेबंद जुळत नसल्याचे दाखवले आहे. शेवटपर्यंत जीवनात कुणाचेच ताळेबंद जुळत नाहीत अशा अर्थाने भाग पुढे जातो आणि मग शेवटी आशेचा किरण दाखवून हा हंगाम संपतो. कुणाच्याही आयुष्याचा ताळेबंद जुळवण्याचे आणि त्यावर सही करण्याचे हक्क फक्त जगन्नियंताकडे आहेत असे माझे मत आहे.

वेबसिरीजचे दोन्ही हंगाम तुम्ही नक्की बघा, पण वित्तीय नजरेतून! दुसरा हंगाम बघितल्यावर त्यातील काही वित्त क्षेत्राशी संबंधित गोष्टी तुम्हाला आढळल्या तर मला देखील कळवा. दोन्ही हंगाम ‘प्राईम व्हिडीओ’वर विनाशुल्क उपलब्ध आहेत.