Harsh Goenka 2X Investing Rule : सध्याची जेन-झी (Gen Z) पिढी त्यांच्या इच्छा, स्वप्ने आणि आकांक्षांशी तडजोड न करता मुक्तपणे जगण्यावर विश्वास ठेवते. आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत या पिढीचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आणि धाडसी असल्याचा पाहायला मिळतो. मात्र, जीवनाचा आनंद घेताना भविष्याचे नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आरपीजी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी यावर अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं आहे. “आजच्या आनंदासाठी खर्च करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच भविष्यातील आर्थिक स्थैर्य जपणेही गरजेचे आहे.” असं सांगत त्यांनी ‘२X इन्व्हेस्टिंग रूल’ हा एक अत्यंत सोपा आर्थिक मंत्र दिला आहे.
अनावश्यक गोष्टींवर जितका खर्च कराल, तितकीच रक्कम भविष्यातील गुंतवणुकीसाठी बाजूला काढणे, हा या नियमाचा मुख्य गाभा आहे. हा नियम पाळल्यास आयुष्यात कधीही आर्थिक संकट ओढावणार नाही, असा विश्वास गोएंका यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे ‘२X इन्व्हेस्टिंग रूल’?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गोएंका यांनी पोस्ट करत हा नियम समजावून सांगितला आहे. आपल्याला गरज नसलेल्या किंवा केवळ मौजमजेसाठी केलेल्या खर्चावर हा नियम लागू होतो. जेव्हा तुम्ही अशा वस्तूवर किंवा अनुभवावर पैसे खर्च करता, तेव्हा तितकीच रक्कम लगेचच चांगल्या ठिकाणी गुंतवण्याची सवय लावा, असं गोएंका यांनी सांगितलं आहे.
उदाहरणार्थ, जर तुम्ही गरज नसताना १०,००० रुपयांची शॉपिंग केली, तर या नियमानुसार तुम्हाला आणखी १०,००० रुपये भविष्यासाठी गुंतवावे लागतील. म्हणजेच तुमच्या खात्यातून २०,००० रुपये जातील. १०,००० रुपये आजच्या आनंदासाठी आणि १०,००० रुपये उद्याच्या सुरक्षेसाठी.
नेटकरी काय म्हणाले?
हर्ष गोएंका यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजचे आयुष्य मनसोक्त जगा, पण त्याची किंमत आपल्या भविष्याकडून वसूल करू नका, हाच संदेश या नियमातून मिळतो, असं एका युजरने म्हटलं आहे, तर एक युजर हा नियम तर खूप चांगला आहे, पण अमलबजावणी करणे कठीण आहे. चांगला अर्थमंत्र असून प्रत्येकाने पाळायला पाहिजे, असंही एकाने म्हटलं आहे.
