Harsh Goenka Warning Indian Startups : गेल्या काही वर्षात देशात स्टार्टअप्सची लाट पाहायला मिळाली. यात काही कंपन्यांनी अल्पवधीत मोठं यश मिळवलं तर काही स्पर्धेतून बाहेर पडल्या. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी कार्पोरेट जगताला गंभीर इशारा दिला आहे. भारतात उद्योग उभारणे म्हणजे दीर्घकालीन कष्ट, संयम आणि सातत्यपूर्ण पुनर्गुंतवणूक असे समीकरण होतं. मात्र, आता ही मानसिकता बदलत चालली असून झटपट परतावा, फुगवलेली मूल्यांकने आणि डिलिव्हरी अॅप्ससारख्या अल्पकालीन डिजिटल व्यवसायांकडे कल वाढल्याचे चित्र दिसत आहे, असं गोएंका यांनी म्हटलं आहे.
झटपट मोठं होण्याची स्पर्धा?
हर्ष गोएंका यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून भारतीय उद्योग जगतातील या बदलत्या मानसिकतेवर अत्यंत गंभीर भाष्य केले आहे. आपल्या पोस्टमध्ये गोएंका यांनी लिहिले, “देशातील कॉर्पोरेट संस्कृतीत काहीतरी मूलभूत बदल घडत आहेत. कष्टाचे महत्त्व कमी होत असून झटपट यशाच्या मागे पळताना लोक दिसत आहेत. अनेक उद्योग घराण्यांमधील नवी पिढी नवे कारखाने किंवा उद्योग उभारण्याऐवजी निष्क्रिय उत्पन्नाला प्राधान्य देत आहे. तर दुसरीकडे आपल्या स्टार्टअप्स कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाऐवजी डिलिव्हरी अॅप्सच्या मागे धावत आहेत.”
गोएंका यांनी भारतीय उद्योजकांना भविष्यातील तंत्रज्ञान आणि संशोधन व विकास या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, “भारताकडे भरपूर कौशल्य आणि भांडवल उपलब्ध आहे. परंतु, आपल्या उद्योजकांनी संशोधन आणि विकास तसेच भविष्याच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची भूक पुन्हा जागृत केली पाहिजे.
गोएंका यांच्या पोस्टवर नेटिझन्स आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा
गोएंका यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर उद्योग क्षेत्राच्या वाटचालीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. यात अनेक तज्ज्ञ आणि नेटकऱ्यांना आपली मतं मांडली आहे. एका युजरने लिहिलंय, की प्रस्थापित उद्योगसमूहसुद्धा दीर्घकालीन मूल्यांपेक्षा मूल्यांकनांच्या मागे धावत आहेत. दुसरा म्हणतो, की आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास नसल्याने भारत अजूनही तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे.
भारतात R&D वर तुलनेने खूप कमी गुंतवणूक
नेटकऱ्यांना उत्तर देताना स्वतः उद्योगपती गोएंका भारतात संशोधन आणि विकासावर म्हणावी तशी गुंतवणूक होत नसल्याचे कबुल करतात. उद्योग जगतातील विश्लेषकांच्या मते, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासासाठी देशात संशोधनावर आधारित उत्पादन क्षेत्राचीच गरज आहे.
