HDFC Bank Chairman Atanu Chakraborty Resignation Reason: देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात आणि गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी आपल्या राजीनाम्यासाठी दिलेले कारण धक्कादायक आहे.

अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण बँकेच्या कार्यपद्धती आणि तेथे प्रचलित असलेल्या काही कार्यप्रणाली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, गेल्या दोन वर्षांत बँकेत अशा काही घटना आणि घडामोडी त्यांनी पाहिल्या आहेत, ज्या त्यांच्या वैयक्तिक मूल्ये आणि नैतिकतेशी सुसंगत नाहीत.

अतनु चक्रवर्ती यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात काय लिहिले?

आपल्या राजीनाम्यात अतनु चक्रवर्ती यांनी लिहिले, “बँकेत अशा काही अंतर्गत गोष्टी घडत आहेत ज्या माझ्या नैतिक तत्त्वांच्या विरोधात आहेत. त्यामुळे, या पदावर पुढेही कार्यरत राहणे मला योग्य वाटत नाही.”

जरी त्यांनी या घटनांचा तपशील उघड केला नसला, तरी त्यांच्या या विधानामुळे बँकेच्या ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’बाबत (संस्थात्मक प्रशासनाबाबत) प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अतनु चक्रवर्ती कोण आहेत?

अतनु चक्रवर्ती हे गुजरात कॅडरमधील १९८५ च्या तुकडीचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. एप्रिल २०२० मध्ये, आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव पदावरून ते निवृत्त झाले. त्यांनी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिले होते.

विविध मंत्रालये आणि विभागांमधील आर्थिक धोरणनिर्मिती प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच संसदेत अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यासह संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारीही अनेकदा पार पडली आहे.

यापूर्वी, २००२ ते २००७ या कालावधीत त्यांनी अर्थ मंत्रालयात सेवा बजावली होती. सुरुवातीला संचालक म्हणून आणि त्यानंतर सहसचिव पदापर्यंत मजल मारली होती.

एचडीएफसीचा शेअर घसरला

अतनु चक्रवर्ती यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्याचा आज एचडीएफसी बँकेच्या शेअरवर नकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी ९:१५ वा. शेअर बाजार उघडताच एचडीएफसीचा शेअर ३७.२५ रुपयांनी (४.४२%) घसरून
८०५.८० रुपयांवर आला आहे.