मुंबई: देशातील सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने माजी अर्धवेळ अध्यक्ष (Part-time Chairman) अतनु चक्रवर्ती यांच्या मानधनाबाबतचा तपशील जाहीर केला आहे. ‘नैतिकता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स’चा मुद्दा उपस्थित करत आर्थिक वर्षाच्या अखेरीस तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या चक्रवर्ती यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण १ कोटी ७ लाख २५ हजार २६९ रुपयांचे मानधन आणि सिटिंग फी देण्यात आल्याचे बँकेच्या ताज्या वार्षिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षातील त्यांच्या १.०३ कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदाच्या मानधनात ३.५३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
कार्यकाळ संपण्यापूर्वीच घेतला होता एक्झिटचा निर्णय
आयएएस केडरचे निवृत्त अधिकारी असलेल्या अतानु चक्रवर्ती यांनी १८ मार्च २०२६ रोजी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ संपायला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असताना त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. बँकेतील काही अंतर्गत पद्धती आणि घडामोडी माझ्या वैयक्तिक मूल्यांशी व नैतिकतेशी सुसंगत नाहीत, असा गंभीर शेरा मारत राजीनामा दिला.
मानधनाचा संपूर्ण हिशोब
वार्षिक अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चक्रवर्ती यांच्यासाठी वार्षिक ५० लाख रुपयांचे निश्चित मानधन मंजूर केले होते. मात्र, त्यांनी १८ मार्च रोजी राजीनामा दिल्यामुळे त्यांना ४८.२५ लाख रुपये अदा करण्यात आले. बोर्ड आणि विविध समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना ५९ लाख रुपये देण्यात आले. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना अधिकृत आणि वैयक्तिक वापरासाठी कारची सुविधाही पुरवण्यात आली होती.
‘त्या’ आरोपांमध्ये तथ्य नाही; बँकेचा दावा
चक्रवर्ती यांच्या धक्कादायक राजीनाम्यानंतर बाजारात बँकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, ज्यामुळे बँकेचे हजारो कोटींचे मार्केट कॅपिटलायझेशनही घटले होते. हा पेच सोडवण्यासाठी बँकेने अंतर्गत चौकशी समितीसह ‘विल्सन सन्सिन गुडरिच अँड रोसाटी’ आणि ‘वाडिया घंडी’ या बाह्य कायदा संस्थांची नियुक्ती केली होती. जून २०२६ मध्ये पूर्ण झालेल्या या कायदेशीर पुनरावलोकनात, चक्रवर्ती यांनी केलेल्या नैतिकतेच्या दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही समकालीन पुरावा आढळला नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
‘ती’ एक आव्हानात्मक घटना: सीईओ शशिधर जगदीशन
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर जगदीशन यांनी भागधारकांना संबोधित करताना सांगितले की, “आर्थिक वर्षाच्या शेवटी चक्रवर्ती यांचा अचानक झालेला एक्झिट हा बँकेसाठी एक आव्हानात्मक प्रसंग होता, ज्याने कॉर्पोरेट गव्हर्नन्सबाबत काही प्रश्न उभे केले. मात्र, बँक आपल्या मजबूत मूल्यांवर ठाम असून अंतर्गत पारदर्शकता तपासण्यासाठी त्वरित पावले उचलली.” चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर बँकेने आरबीआयच्या मंजुरीने केकी मिस्त्री यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
दरम्यान, अंतर्गत वाद आणि मतभेदांची ही किनार असली, तरी एचडीएफसी बँकेने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ७६,०२५.९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
