वृत्तसंस्था : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), डिजिटल प्रणाली आणि ऑटोमेशनचा वाढता स्वीकार आता बँकिंग क्षेत्रातील रोजगारावर परिणाम करू लागला आहे. देशातील सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने मनुष्यबळात मोठी कपात केली आहे. बँकेच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३,३४३ ने घटली आहे. अंतर्गत ऑपरेशन्सचे ऑटोमेशन (स्वयंचलितीकरण) केल्यामुळे प्रामुख्याने खालच्या पातळीवरील आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांवर याची कुऱ्हाड कोसळल्याचे समोर आले आहे.

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, बँकेच्या एकूण कर्मचारी संख्येचा विचार केला, तर ३१ मार्च २०२५ रोजी ही संख्या २,१४,५२१ इतकी होती, ती ३१ मार्च २०२६ अखेर घसरून २,११,१७८ वर आली आहे.

व्यवस्थापकीय पदे वाढली; नॉन-सुपरवायझरी स्टाफमध्ये मोठी घट

वार्षिक अहवालातील आकडेवारीचे विश्लेषण केले असता एक महत्त्वाची बाब समोर येते, ती म्हणजे बँकेने व्यवस्थापकीय (Management) पातळीवर भरती सुरूच ठेवली आहे, मात्र नॉन-सुपरवायझरी (Non-Supervisory) म्हणजेच लिपिक किंवा साहाय्यक वर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत तब्बल ८,१५३ ची मोठी घट झाली आहे.

कर्मचाऱ्यांची श्रेणीनिहाय आकडेवारी (आर्थिक वर्ष २०२६)

वरिष्ठ व्यवस्थापन (Senior Management): २४७ वरून २६२ (१५ ने वाढ)
मध्यम व्यवस्थापन (Middle Management): ९,१५९ वरून १०,४११ (१,२५२ ने वाढ)
कनिष्ठ व्यवस्थापन (Junior Management): ३४,१६५ वरून ३७,७०८ (३,५४३ ने वाढ)
नॉन-सुपरवायझरी स्टाफ (Non-Supervisory): १,७०,९५० वरून १,६२,७९७ (८,१५३ ने घट)

अब्जावधींची गुंतवणूक आणि जेनेरेटिव्ह एआयचे प्रशिक्षण

एचडीएफसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) शशिधर जगदीशन यांनी स्पष्ट केले की, बँक स्वतःला एक ‘टेक-फर्स्ट’ (तंत्रज्ञानाला प्राधान्य देणारी) संस्था म्हणून उभारत आहे. यासाठी बँकेने तंत्रज्ञान आणि डिजिटल आर्किटेक्चरमधील गुंतवणूक चौपट वाढवून ती सुमारे १ अब्ज डॉलर इतकी केली आहे.

या अंतर्गत पगार खाती उघडणे, ऑनबोर्डिंग प्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांची अंतर्गत कामे जेनेरेटिव्ह एआय (GenAI) द्वारे स्वयंचलित केली जात आहेत. या तांत्रिक बदलांशी जुळवून घेण्यासाठी बँकेने आपल्या ५०,६३१ हून अधिक कर्मचाऱ्यांना ‘GenAI अकॅडमी’द्वारे विशेष प्रशिक्षण दिले आहे, तर २,१०० कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्ट कोपायलटचे (Microsoft Copilot) प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शाखा विस्तार सुरूच, पण मनुष्यबळाची गरज घटली

धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे बँक देशभरात आपल्या नवीन शाखांचा विस्तार करत आहे, मात्र डिजिटल प्रॉडक्ट्स, ऑटोमेटेड कॉल्स आणि सिस्टीम-ड्रिव्हन प्रक्रियांमुळे नव्या शाखांमध्ये पूर्वीसारख्या मोठ्या मनुष्यबळाची गरज भासत नाहीये. केवळ एचडीएफसी बँकच नाही, तर ॲक्सिस बँक (३,१०० हून अधिक कर्मचारी कपात) आणि आरबीएल बँकेनेही (९४९ कर्मचारी कपात) याच आर्थिक वर्षात तंत्रज्ञानाचा फायदा घेत आपल्या मनुष्यबळाचे ‘ऑप्टिमायझेशन’ (कपात) केले आहे. प्रारंभीच्या टप्प्यात ग्राहक सेवा, किरकोळ विक्री आणि बॅक-ऑफिस सपोर्ट या क्षेत्रातील एंट्री-लेव्हलच्या नोकऱ्यांवर याचा सर्वाधिक प्रभाव पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.