मुंबई : खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन यांनी आपल्या पदावर पुनर्नियुक्ती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या सध्याच्या कार्यकाळाची मुदत संपल्यानंतर २६ ऑक्टोबर २०२६ रोजी ते बँकेच्या सेवेतून निवृत्त होतील.

जगदीशन यांनी शनिवारी आपल्या निर्णयाची माहिती बँकेच्या संचालक मंडळाला दिली. मंडळाने त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, जगदीशन यांनी पुनर्नियुक्ती न घेण्याचा निर्णय कायम ठेवला. 

जगदीशन यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. बँकेमध्ये नेतृत्वबदल सुरळीतपणे हस्तांतरित व्हावे यासाठी ही प्रक्रिया मुदत संपण्यापूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

जवळपास तीन दशकांचा प्रवास

सशिधर जगदीशन यांचा एचडीएफसी बँकेसोबतचा प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. त्यांनी १९९६ मध्ये वित्त विभागात व्यवस्थापक म्हणून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर १९९९ मध्ये ते वित्त विभागाचे प्रमुख झाले आणि २००८ मध्ये बँकेचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. पुढे ऑक्टोबर २०२० मध्ये आदित्य पुरी यांच्यानंतर त्यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती झाली.

एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेतही जगदीशन यांची महत्त्वाची भूमिका राहिली. हे विलीनीकरण भारतीय उद्योग जगतातील सर्वात मोठ्या विलीनीकरणांपैकी एक ठरले.

बँकेसमोर नेतृत्वबदलाचे आव्हान

जगदीशन यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड अशा वेळी होत आहे, जेव्हा एचडीएफसी बँकेच्या कारभाराबाबत गुंतवणूकदारांमध्ये काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मार्चमध्ये बँकेचे तत्कालीन अंशकालीन अध्यक्ष अतानू चक्रवर्ती यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर बँकेच्या प्रशासन आणि नैतिकतेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या बाह्य कायदेशीर परीक्षणात चक्रवर्ती यांनी उपस्थित केलेल्या प्रशासनविषयक चिंतेला पुष्टी देणारे पुरावे आढळले नसल्याचे समोर आले.

याशिवाय, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी (एमएसआरडीसी) संबंधित ठेवींच्या व्याजदर प्रकरणाच्या अंतर्गत चौकशीनंतर जुलैमध्ये जगदीशन यांच्यासह बँकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, एचडीएफसी बँकेच्या समभागावरही अलीकडच्या काळात दबाव राहिला आहे. नेतृत्वबदलाबरोबरच विलीनीकरणानंतरच्या कामगिरीबाबत गुंतवणूकदारांच्या अपेक्षा आणि बँकेच्या निव्वळ व्याज मार्जिनशी संबंधित चिंता यामुळे समभागाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. जगदीशन यांच्या निवृत्तीमुळे देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एका बँकेच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल होणार असून, आता त्यांच्या उत्तराधिकारीपदी कोणाची निवड होते याकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.