मुंबई : देशातील सर्वांत मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या नेतृत्वबदलाची प्रक्रिया आता वेग घेण्याची शक्यता आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शशीधर जगदीशन यांनी आपल्या विद्यमान कार्यकाळानंतर पुनर्नियुक्ती न घेण्याचा निर्णय घेतल्याने नव्या सीईओच्या निवडीकडे बँकिंग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जगदीशन यांचा कार्यकाळ २६ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे.

जगदीशन यांच्या निर्णयानंतर एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक (डेप्युटी एमडी) कैझाद एम. भरुचा यांचे नाव संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आले आहे. भरुचा हे एचडीएफसी बँकेतील सर्वाधिक अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असून ऑक्टोबर १९९५ पासून ते बँकेशी जोडलेले आहेत. त्यामुळे बँकेच्या अंतर्गत नेतृत्वातूनच पुढील सीईओ निवडला जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

१९९५ पासून एचडीएफसी बँकेसोबत

कैझाद भरुचा यांचा एचडीएफसी बँकेतील प्रवास जवळपास तीन दशकांचा आहे. बँकेच्या सुरुवातीच्या काळापासून ते संस्थेसोबत आहेत. सध्या ते डेप्युटी एमडी म्हणून कार्यरत असून बँकेच्या होलसेल बँकिंग, कॅपिटल आणि कमॉडिटी मार्केट्स तसेच रिअल्टी बिझनेस फायनान्स यांसारख्या महत्त्वाच्या व्यवसायांची जबाबदारी सांभाळतात.

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेतही भरुचा यांची महत्त्वाची भूमिका होती. दोन्ही संस्थांच्या एकत्रीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंटिग्रेशन कमिटीचे नेतृत्व त्यांनी केले होते. त्यामुळे बँकेच्या व्यवसायाची रचना, कर्जवाटप, कॉर्पोरेट बँकिंग तसेच विलीनीकरणानंतरच्या एकत्रित संस्थेच्या कामकाजाची त्यांना सखोल माहिती आहे.

२०२० मध्येही होते दावेदार

कैझाद भरुचा यांचे नाव एचडीएफसी बँकेच्या सीईओपदासाठी यापूर्वीही चर्चेत आले होते. २०२० मध्ये तत्कालीन दीर्घकाळचे सीईओ आदित्य पुरी यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीच्या वेळी भरुचा हे प्रमुख अंतर्गत उमेदवार होते. त्यांच्यासोबत शशीधर जगदीशन आणि सिटीबँकेचे सुनील गर्ग हे प्रमुख दावेदार होते. अखेरीस रिझर्व्ह बँकेने शशीधर जगदीशन यांच्या नावाला मंजुरी दिली आणि ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी एचडीएफसी बँकेच्या एमडी आणि सीईओपदाची सूत्रे स्वीकारली. २०२३ मध्ये त्यांना आणखी तीन वर्षांचा कार्यकाळ मिळाला. त्यामुळे आता जगदीशन यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर २०२० मध्ये त्यांच्या शर्यतीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भरुचा यांच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वळले आहे.

मात्र अंतिम निर्णय अद्याप बाकी

भरुचा यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांची सीईओपदी नियुक्ती निश्चित झालेली नाही. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाला उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया पूर्ण करून त्यासाठी आवश्यक नियामक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. विशेषतः बँकेच्या सर्वोच्च व्यवस्थापकीय पदासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी महत्त्वाची ठरणार आहे. बँकेचे संचालक मंडळ उत्तराधिकारी निवडीची प्रक्रिया वेगाने राबवणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे अंतर्गत उमेदवारांबरोबरच बाहेरील अनुभवी बँकरचाही विचार केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बँकेसमोरील नेतृत्वाचे आव्हान

जगदीशन यांच्या निर्णयाची पार्श्वभूमी एचडीएफसी बँकेसाठी महत्त्वाची आहे. २०२६ मध्ये बँकेच्या नेतृत्व आणि प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. मार्चमध्ये तत्कालीन अंशकालीन अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर बँकेच्या कारभाराबाबत चर्चा सुरू झाली होती. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यातील आरोपांची स्वतंत्र कायदेशीर तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणारे पुरावे आढळले नसल्याचे बँकेने म्हटले होते. त्यानंतर माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची बँकेच्या अंशकालीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर जुलैमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी (एमएसआरडीसी) संबंधित ठेवींच्या प्रकरणात अंतर्गत तपासणीनंतर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि रिटेल अॅसेट्स प्रमुख अरविंद बोरा यांच्यावर प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. बँकेने या प्रकरणाला ‘बिझनेस ओव्हररीच’ असे संबोधले होते.

‘विलीनीकरणा’नंतरच्या टप्प्यात नवे नेतृत्व

एचडीएफसी बँकेसाठी पुढील सीईओची निवड केवळ नेतृत्वबदलापुरती मर्यादित राहणार नाही. एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत झालेले विलीनीकरण ही भारतीय वित्तीय क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कॉर्पोरेट व्यवहारांपैकी एक होती. जगदीशन यांच्या नेतृत्वाखाली या विलीनीकरणाची अंमलबजावणी झाली. आता विलीनीकरणानंतरच्या पुढील वाढीच्या टप्प्यात बँकेला नेण्याची जबाबदारी नव्या सीईओवर असेल. ठेवी वाढवणे, कर्जवाढीचा वेग कायम ठेवणे, नफ्यात सुधारणा करणे, डिजिटल व्यवसायाचा विस्तार आणि प्रशासनाबाबत गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत करणे ही नव्या नेतृत्वापुढील प्रमुख आव्हाने असतील.

गुंतवणूकदारांचेही लक्ष

जगदीशन यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेच्या समभागावरही दबाव आला आहे. २०२६ मध्ये बँकेच्या समभागाच्या कामगिरीवर आधीच गुंतवणूकदारांची नाराजी आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्नांचा परिणाम झाला आहे. त्यामुळे नव्या सीईओच्या निवडीकडे बाजाराचे बारकाईने लक्ष असेल.
भरुचा यांची दीर्घकाळाची एचडीएफसी बँकेतील कारकीर्द, व्यवसायाची सखोल माहिती आणि विलीनीकरणाच्या प्रक्रियेतील अनुभव त्यांना मजबूत अंतर्गत उमेदवार बनवतो. मात्र अंतिम निर्णय संचालक मंडळ आणि त्यानंतरच्या नियामक प्रक्रियेतूनच होणार असल्याने सध्या भरुचा यांचे नाव ‘संभाव्य उत्तराधिकारी’ म्हणूनच पाहिले जात आहे. २६ ऑक्टोबरनंतर एचडीएफसी बँकेची धुरा कोणाच्या हाती जाणार, याची घोषणा आता बँकिंग क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाच्या उत्तराधिकार प्रक्रियांपैकी एक ठरणार आहे.