HDFC Bank penalties on 12 officials for involvement in mis-selling of Credit Suisse AT1 bonds: क्रेडिट सुईसशी संबंधित अतिरिक्त टियर-१ (AT1) रोख्यांच्या (बॉण्ड्स) गैर-विक्रीमध्ये कथित भूमिकेबद्दल एचडीएफसी बँकेने किमान १२ वरिष्ठ आणि मध्यम-स्तरीय अधिकाऱ्यांवर दंड आकारला आहे, अशी माहिती या घडामोडींची माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी दिली.
या कारवाईमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची वेतनवाढ आणि कर्मचारी स्टॉक पर्याय (ESOPs) रद्द करण्याचा समावेश आहे. ज्यांच्यावर कारवाई होत आहे, त्यांमध्ये शाखा बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स आणि मार्केटिंगचे ग्रुप हेड आशिष पार्थसारथी यांचा समावेश आहे. याबाबत इकॉनॉमिक टाईम्सने वृत्त दिले आहे.
अतिरिक्त टियर-१ रोखे प्रकरणी बँकेने आधीच काही कठोर पावले उचलली होती, त्यानंतर आता ही दंडात्मक कारवाई केली आहे. यापूर्वी २१ मार्चला अंतर्गत तपासात दोषी आढळल्याने बँकेने संपत कुमार (ग्रुप हेड, ब्रँच बँकिंग), हर्ष गुप्ता आणि पायल मंध्यान या तीन बड्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले होते.
मध्य पूर्व, आफ्रिका आणि एनआरआय ऑनशोर व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष हर्ष गुप्ता आणि पायल मंध्यान यांना जानेवारी २०२५ मध्ये निलंबित करण्यात आले होते, कारण बँकेने आपल्या दुबई शाखेत कथित गैर-विक्रीबद्दल अंतर्गत चौकशी सुरू केली होती. तपासात असे दिसून आले की, अनेक अतिरिक्त टियर-१ रोखे गुंतवणूकदारांनी असा आरोप केला होता की, त्यांना त्यांच्या परकीय चलन अनिवासी (FCNR) ठेवी भारतातून बहरीनमध्ये हलवण्यासाठी प्रोत्साहित केले गेले होते.
हा वाद मार्च २०२३ पासून सुरू झाला, जेव्हा स्विस अधिकाऱ्यांनी यूबीएसद्वारे क्रेडिट सुईसच्या आपत्कालीन अधिग्रहणाचा भाग म्हणून तिचे एटी१ रोखे शून्यावर आणले, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.
दुबई फायनान्शिअल सर्व्हिसेस ऑथोरिटीची कारवाई
“अंतर्गत धोरणांनुसार योग्य ती सुधारणात्मक कारवाई करण्यात आली आहे. बँकेच्या आचारसंहितेनुसार योग्य कारवाईसह कर्मचारी बदल करण्यात आले आहेत”, असे एचडीएफसी बँकेने २१ मार्च रोजी सांगितले होते.
सप्टेंबर २०२५ मध्ये एचडीएफसी बँकेने जाहीर केले होते की, दुबई वित्तीय सेवा प्राधिकरणाने दुबई फायनान्शिअल सर्व्हिसेस ऑथोरिटीने त्यांच्या डीआयएफसी (DIFC) शाखेला नवीन ग्राहक जोडण्यास किंवा नवीन व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.
या शाखेला वित्तीय उत्पादनांवर सल्ला देणे, गुंतवणुकीचे सौदे आयोजित करणे, पतपुरवठा करणे यासारख्या विविध वित्तीय सेवांमध्ये नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यास किंवा त्यांच्यासोबत व्यवसाय करण्यास मनाई कायम आहे.
अतिरिक्त टियर-१ (AT1) रोखे म्हणजे काय?
AT-1 रोखे हे एक प्रकारचे कर्जसाधन (Debt Instrument) आहेत, जे बँका आपली भांडवली भक्कमता बळकट करण्यासाठी जारी करतात. हे रोखे पारंपारिक रोख्यांच्या तुलनेत अधिक जोखीमपूर्ण असतील अशा प्रकारे त्याची रचना केली आहे आणि या अतिरिक्त जोखीमेची भरपाई करण्यासाठी, ते गुंतवणूकदारांना अधिक व्याजदर देतात.
हे रोखे आरबीआयच्या निर्देशांनुसार बँकांद्वारे जारी केले जातात. वर नमूद केल्याप्रमाणे, बँका त्यांच्या भांडवली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे रोखे जारी करतात. एकदा तुम्ही या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली की, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर नियमित व्याज मिळू लागते.
जोपर्यंत बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तोपर्यंत तुम्हाला व्याज मिळत राहील. जर बँकेची भांडवली पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा कमी झाली, तर ती आपले भांडवल व्यवस्थापित करताना आपले कर्ज कमी करण्यासाठी बॉण्ड्सचे इक्विटीमध्ये रूपांतर करू शकते. जर बँक अयशस्वी झाली, तर तुमची गुंतवणूक धोक्यात येते. शिवाय, जर आरबीआयला बँकेची आर्थिक स्थिती अस्थिर वाटली, तर ती बँकेला तिचे एटी-१ रोखे परत मागवण्याचे निर्देश देऊ शकते. याव्यतिरिक्त, आर्थिक संकटाच्या परिस्थितीत, बँका गुंतवणूकदारांना व्याज देणे बंद करू शकतात.
