भारतीय घराघरांत इंटरनेट पोहोचवण्यासाठी रिलायन्स जिओने त्यांचे फिक्स्ड वायरलेस ब्रॉडबँड सोल्युशन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे, जे आपल्याला 5G नेटवर्कचा लाभ देणार आहे. 5G नेटवर्क आणि सर्वोत्तम वायरलेस तंत्रज्ञान वापरून Jio Air Fiber घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात जिओ एअर फायबरच्या आगमनाने अनेक बदल पाहायला मिळतील. Jio Air Fiber पुढील तीन वर्षांत नेटवर्कद्वारे सुमारे २०० दशलक्ष ग्राहकांशी जोडली जाणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला जिओच्या कट्टर प्रतिस्पर्धी भारती एअरटेलने 5G तंत्रज्ञानावर आधारित असेच उत्पादन दिल्ली आणि मुंबई येथे लॉन्च केले होते, ज्याचे नाव Xstream AirFiber आहे.
ही नवीन बाजारपेठेची सुरुवात तर नाही ना?
२०१६ मध्ये Jio ने आपली 4G सेवा सुरू केल्यापासून भारतीय दूरसंचार बाजारपेठेत कायमच स्पर्धात्मक वातावरण राहिले आहे. मोबाइल डेटाची किंमत लक्षणीयरीत्या खाली आणली गेली आणि देशभरात डेटा वापरात मोठ्या प्रमाणात तेजी आली. मोबाइल युजर्स त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत असतानाच जिओनं ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, या दृष्टीनं एक पाऊल पुढे जात Jio AirFibre लाँच केले. त्यामुळे जिओ भारताच्या कमी होत चाललेल्या होम ब्रॉडबँड बाजारात आपल्या यशाची छाप सोडणार आहे. “१० दशलक्षाहून अधिक परिसर आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी म्हणजेच जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो कॅम्पस असे आहेत, जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करणार आहे. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करीत आहोत. Jio Air Fiber लाँच केल्यामुळे Jio दररोज १.५ लाख नवीन ग्राहक जोडण्यास सक्षम असेल,” असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी कंपनीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. JioAirFiber कंपनीचे 5G नेटवर्क कव्हरेज आणि प्रगत वायरलेस तंत्रज्ञानावर आधारित असून, जिथे जिओ फायबर केबल नेटवर्क पोहोचलेले नाही, तिथे पोहोचवण्यासाठी ते बनवले आहे. त्यामुळे दैनंदिन कनेक्शन जवळपास दहा पटीने वाढू शकणार आहेत, असंही मुकेश अंबानींनी सांगितलं.
भारतातील ब्रॉडबँड बाजार किती मोठा?
मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये भारताने लक्षणीय वाढ पाहिली असली तरीही होम ब्रॉडबँड कव्हरेजचाही वापर मोठ्या प्रमाणात होतोय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२३ पर्यंत देशात ३५ दशलक्ष वायर्ड ब्रॉडबँड ग्राहक होते. परंतु फिक्स्ड वायरलेस ब्रॉडबँड बाजार लहान असून, त्याद्वारे जून अखेरीस सुमारे ९५०,००० ग्राहक (९.१७ दशलक्ष) जोडले गेल्याची माहिती TRAI ने दिली आहे. सध्याच्या वायर्ड ब्रॉडबँड कंपन्या म्हणजे वायर नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या रिलायन्स जिओ (९.१७ दशलक्ष), भारती एअरटेल (६.५४ दशलक्ष), बीएसएनएल (३.६६ दशलक्ष), एट्रिया कन्व्हर्जन्स (२.१६ दशलक्ष) आणि हॅथवे (१.१२ दशलक्ष) आहेत.
हेही वाचाः बाबरच्या विरोधात लढणारे ‘मेव मुस्लीम’ कोण आहेत? नूह हिंसाचारानंतर पुन्हा चर्चेत का आले?
Air Fibreचा प्रभाव काय असू शकतो?
एका विश्लेषक नोटमध्ये मॉर्गन स्टॅन्ले म्हणाले की, सध्या जिओ फायबर १० दशलक्ष घरांपर्यंत पोहोचले आहे आणि त्याची ऑप्टिकल फायबर केबल १.५ दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त आहे. Jio AirFiber सह त्यात दररोज १५०,००० घरे जोडण्याची क्षमता आहे. “कंपनीने होम ब्रॉडबँडसाठीचे आपले लक्ष वाढवले असून, १०० दशलक्ष घरांवरून थेट २०० दशलक्ष घरांपर्यंत नेले आहे.” घराघरांतील नेटवर्कच्या विस्तारामुळे स्मार्ट होम सोल्युशन्स लाभदेखील मिळू शकतो, असे जेफरीज या फर्मने म्हटले आहे.
हेही वाचाः वायरलेस हायस्पीड ५ जी डेटा पुरवणारे ‘जिओ एअर फायबर’ काय आहे? जाणून घ्या सविस्तर…
जिओ एअर फायबर काम कसे करणार?
मिळालेल्या माहितीनुसार, जिओ एअर फायबर वापरायचे असल्यास इमारतीवर एक छोटा अँटेना लावावा लागणार आहे. या अँटेनाच्या मदतीने जिओ एअर फायबर इंटरनेटचा पुरवठा करणार आहे. हा अँटेना थेट रिलायन्स टॉवरशी जोडलेला असेल. अँटेनाचे थेट टॉवरशी कनेक्शन असल्यामुळे ग्राहकांना संपूर्ण वायरलेस कनेक्शन मिळणार आहे. यामुळे कोणत्याही अडथळ्याविना डेटा वापरता येणार आहे. जिओ एअर फायबर हे एक प्लग अँड प्ले डिव्हाईस आहे. म्हणजेच या उपकरणाच्या माध्यमातून घरी किंवा ऑफिसमध्ये हायस्पीड इंटरनेट मिळू शकते. ५ जी इंटरनेटच्या मदतीने जिओ एअर फायबर हे एका वायफाय हॉटस्पॉटप्रमाणे काम करेल. कोणत्याही केबलशिवाय हे उपकरण जवळपास १ GBPS पर्यंत इंटरनेट स्पीड देणार आहे. विशेष म्हणजे जिओ एअर फायबरशी लॅपटॉप, ऑफिस कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, स्मार्टफोन अशी वेगवेगळी उपकरणं जोडता येणार आहेत.