scorecardresearch

डॉर्सींच्या संपत्तीचा दिवसांत ५२.६ कोटी डॉलरने ऱ्हास; हिंडेनबर्ग रिसर्चचा अदानी समूहानंतर ‘ब्लॉक इन्क’ला दणका

हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहानंतर आता तंत्रज्ञान क्षेत्रातील ब्लॉक इन्कॉर्पोरेशन या कंपनीला दणका दिला आहे.

hindenburg research
हिंडेनबर्ग रिसर्च( Photo Courtesy: Indian Express)

सॅनफ्रान्सिस्को: हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहानंतर आता तंत्रज्ञान क्षेत्रातील ब्लॉक इन्कॉर्पोरेशन या कंपनीला दणका दिला आहे. कंपनीत गैरप्रकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात ५२.६ कोटी डॉलर म्हणजेच ११ टक्क्यांची घसरण झाली आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चचा ब्लॉक कंपनीबाबतचा अहवाल गुरुवारी (२३ मार्च) जाहीर झाला. कंपनीने ग्राहकांची संख्या फुगवल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. कंपनीच्या आर्थिक मूलभूत स्थितीचा विचार करता तिच्या समभागांचे मूल्य ६५ ते ७५ टक्क्यांनी कमी असायला हवे होते, असेही अहवालात म्हटले आहे. कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, हिंडेनबर्ग रिसर्चच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल बाहेर आल्यानंतर ब्लॉकचे समभाग भांडवली बाजारात कोसळले. कंपनीचा समभाग सुरुवातीला २२ टक्क्यांनी घसरला. अखेर तो १५ टक्के घसरणीसह बंद झाला.

डॉर्सींचे ब्लॉकमध्ये ३ अब्ज डॉलर

ब्लूम्बर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार डॉर्सी यांची संपत्ती आता ११ टक्क्यांनी कमी होऊन ४.४ अब्ज डॉलरवर आली आहे. डॉर्सी हे ट्विटरचे सहसंस्थापक होते. त्यांच्या संपत्तीतील मोठ्या प्रमाणात हिस्सा आता ब्लॉकमध्ये आहे. ब्लूमबर्ग मालमत्ता निर्देशांकानुसार, डॉर्सी यांचा ब्लॉक कंपनीतील हिस्सा सुमारे ३ अब्ज डॉलरच्या आसपास आहे. याचवेळी इलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटरमध्ये डॉर्सींचा हिस्सा ३८.८ कोटी डॉलर आहे.

हिंडेनबर्गच्या आधीच्या अहवालांचे परिणाम
निकोला कॉर्पोरेशनमधील गैरप्रकाराचा अहवाल सप्टेंबर २०२० मध्ये जाहीर झाल्यानंतर कंपनीचे समभाग कोसळले होते. अखेर चौकशीनंतर कंपनीचे संस्थापक ट्रेव्हर मिल्टन हे दोषी आढळले.भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. ब्लूमबर्ग संपत्ती निर्देशांकानुसार आता ते २१ व्या स्थानी घसरले असून, त्यांची संपत्ती ६० अब्ज डॉलर खाली आली आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालातील अमृता अहुजा कोण?

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चने आता अब्जाधीश उद्योगपती जॅक डॉर्सी यांची मोबाइल पेमेंट कंपनी ब्लॉकबाबत अहवाल जाहीर केला आहे. यानंतर कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी अमृता अहुजा यांचे नाव चर्चेत आले आहे.

अमृता अहुजा यांचे मूळ भारतीय पालक अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. अमेरिकेतच जन्मलेल्या अमृता यांनी ड्यूक विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली असून, हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रातील पदवी मिळविली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेच्या त्या माजी विद्यार्थी आहेत.

अमृता अहुजा या कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी आणि मुख्य कार्यपालन अधिकारीही आहेत. त्या डिस्कॉर्ड आणि एअर बीएनबी या कंपन्यांच्या संचालक मंडळावरही आहेत. त्याआधी त्या ब्लिझार्ड एंटरटेन्मेंट कंपनीच्या त्या मुख्य वित्तीय अधिकारी होत्या. अहुजा यांना आधी स्क्वेअर इन्कॉर्पोरेशनच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. नंतर २०२१ मध्ये या कंपनीचे नामकरण ब्लॉक करण्यात आले.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 13:50 IST

संबंधित बातम्या