Home Loan Prepayment Trick : गृहकर्ज हा प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय मानला जातो. कारण, एखाद्या फ्लॅटचं कर्ज फेडण्यासाठी हयातभर हप्ते भरावे लागतात. त्यामुळेच घर खरेदी करताना १०० वेळा विचार करावा, असं जाणकार सांगतात. कारण, एकदा तुमचा ईएमआय सुरू झाला की मग संपेपर्यंत तुमची पाठ सोडत नाही. तुम्हीही २० वर्षांसाठी होम लोन घेतले असेल, तर एक सोपी युक्ती तुमचे तब्बल लाखो रुपये वाचवू शकते. शिवाय तुमचे कर्जही ५ वर्षे आधी संपेल. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. कसे ते पाहुयात.

कशी होते लाखांची बचत?

समजा, तुम्ही बँकेकडून ४० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे. त्यावर वार्षिक ८.५ टक्के व्याजदर आकारला जात असून २० वर्षांची मुदत आहे. या प्रकरणात तुमचा दरमहा ईएमआय सुमारे ३४,७१३ रुपये येईल. २० वर्षांत तुम्हाला बँकेला मूळ मुद्दलसह एकूण सुमारे ८३.३१ लाख रुपये चुकते करावे लागतील. यात ४० लाख रुपये मूळ रक्कम आणि तब्बल ४३.३१ लाख रुपये व्याज असणार आहे. जर तुम्ही ठरवले की हेच कर्ज २० वर्षांऐवजी १५ वर्षांत संपवायचे आहे, तर तुमची मासिक EMI वाढून सुमारे ३९,३९० रुपये होईल. याचा अर्थ तुम्हाला दरमहा केवळ ४,६७७ रुपये अतिरिक्त भरावे लागतील. थोडीशी जास्त ईएमआय भरल्यामुळे तुमचे कर्ज ५ वर्षे आधीच संपेल आणि एकूण व्याज घसरून ३०.९० लाख रुपयांवर येईल. म्हणजेच, दरमहा अवघे ४,६७७ रुपये जास्त भरून तुम्ही १२.४१ लाख रुपयांच्या मोठ्या व्याजाची बचत करू शकता.

तपशील २० वर्षांचे लोन १५ वर्षांचे लोन
कर्जाची एकूण रक्कम४० लाख रुपये४० लाख रुपये
वार्षिक व्याजदर ८.५०%८.५०%
कर्जाची मुदत२० वर्षे१५ वर्षे
दरमहा EMI३४,७१३ रुपये३९,३९० रुपये
एकूण भरलेली रक्कम८३.३१ लाख रुपये७०.९० लाख रुपये
एकूण द्यावे लागणारे व्याज४३.३१ लाख रुपये३०.९० लाख रुपये

मुदतपूर्व कर्ज फेडण्याचा पर्याय

जर तुमचे बजेट आधीच खूप तणावात असेल तर तुम्ही मुदतपूर्व कर्ज फेडण्याचा पर्याय वापरू शकता. म्हणजे बोनस किंवा उत्पन्नातून मिळालेली अतिरिक्त रक्कम तुम्ही थेट होम लोनच्या मुद्दलात भरू शकता. यामुळे कर्जाची मूळ रक्कम वेगाने कमी होते आणि परिणामी पुढील व्याजही घटते. बँक किंवा वित्तीय संस्थेकडे प्रीपेमेंट करताना EMI कमी करून घेण्याऐवजी ‘कर्जाचा कालावधी कमी करा’ हा पर्याय निवडणे फायद्याचे ठरते. काही बँका मुदतपूर्व कर्ज फेडल्यास काही शुल्क आकारतात. त्यामुळे कर्ज घेताना किंवा फेडताना याची चौकशी करायला विसरू नका. जर तुम्ही योग्य आर्थिक नियोजन आणि शिस्त पाळली तर ५ वर्ष आधीच कर्जाचं ओझं डोक्यावरुन उतरवू शकता. शिवाय काही लाख रुपयांची बचतही होईल.