नवी दिल्ली: वाढता उत्पादन खर्च आणि कच्च्या मालाच्या किमतींमधील वाढीमुळे आघाडीची वाहन निर्माती कंपनी असलेल्या ह्युंदाई मोटर इंडियाने वाहनांच्या किमतीत १२,८०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
विविध उत्पादन पातळ्यांवर कंपनीच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला वाहनांच्या किमतीत वाढ करावी लागली आहे. ही वाढ म्हणजे कंपनीने विद्यमान वर्षात ८ एप्रिल २०२६ रोजी केलेल्या घोषणेचाच एक पुढचा टप्पा आहे. त्यावेळी, विविध खर्चांमधील वाढीचे कारण देत, कंपनीने संपूर्ण वाहन श्रेणीमध्ये १ टक्क्यांची दरवाढ लागू करण्याची घोषणा केली होती.
वाहनांच्या किमतींमधील वाढ ही जास्तीत जास्त १२,८०० रुपयांपर्यंत असेल आणि ती वाहन प्रकारानुसार वेगवेगळी असेल, असे कंपनीने म्हटले आहे. कच्च्या मालाचा वाढता खर्च, वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि वाढलेला परिचालन खर्च यांसारख्या विविध कारणांमुळे ही दरवाढ करणे आवश्यक ठरल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनी खर्चाचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असली, तरीही वाढलेल्या खर्चाचा काही भाग या नाममात्र दरवाढीद्वारे बाजारावर (ग्राहकांवर) टाकणे कंपनीला अपरिहार्य ठरले आहे. नवीन दरवाढ येत्या १ जून २०२६ पासून लागू होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
मारुती सुझुकीपाठोपाठ ह्युंदाईचा निर्णय
देशातील वाहन निर्मिती क्षेत्र सध्या कच्च्या मालाच्या आणि लॉजिस्टिकच्या वाढत्या खर्चामुळे दबावाखाली आहे. काही दिवसांपूर्वीच मारुती सुझुकीनेही वाहनांच्या किमतीत ३०,००० रुपयांपर्यंत वाढीची घोषणा केली होती, त्यानंतर आता ह्युंदाईनेही देखील हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे नवीन वाहन घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. आगामी काळात आणखी वाहन निर्मात्या कंपन्यांकडून देखील वाहनांच्या किमतीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
