मुंबई: गुंतवणूकदारांना एकाच पोर्टफोलिओमध्ये विविध मालमत्ता वर्गांचा लाभ मिळवून देण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडाने नवीन ‘मल्टी-ॲसेट ॲक्टिव्ह फंड ऑफ फंड’ या योजनेच्या ‘एनएफओ’ची घोषणा केली आहे. ही नवीन योजना ३० जून रोजी खुली झाली असून, गुंतवणूकदारांना १४ जुलैपर्यंत त्यात गुंतवणूक करता येईल.

एकाच फंडात तीन पर्याय असणारा ही एक ‘फंड ऑफ फंड्स’ धाटणीची योजना असून, ती प्रामुख्याने वेगवेगळ्या समभाग (इक्विटी) योजना, रोखेसंलग्न (डेट) योजना आणि गोल्ड/सिल्व्हर ईटीएफ यामध्ये गुंतवणूक करेल. आर्थिक चक्र, महागाई, व्याजदर आणि बाजारातील चढ-उतार लक्षात घेऊन फंड व्यवस्थापकांकडून या घटकांमधील गुंतवणुकीचे प्रमाण वेळोवेळी बदलले जाईल.

आर्थिक चक्र आणि बाजाराच्या चक्रानुसार वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांची कामगिरी बदलत असते. म्हणूनच शिस्तबद्ध मालमत्ता विभाजन (ॲसेट अलोकेशन) दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही योजना खास मूल्यांकन आणि मॅक्रो-इकॉनॉमिक मॉडेलच्या आधारे गुंतवणूकदारांना एका संशोधन-आधारित प्रक्रियेद्वारे सर्वच क्षेत्रांतील संधींचा लाभ मिळवून देईल, असे या योजनेसंबंधी आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी शंकरन नरेन म्हणाले.

योजनेच्या ‘एनएफओ’ कालावधीमध्ये गुंतवणूकदार किमान १,००० रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. योजनेत २४ महिने किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक ठेवणारे गुंतवणूकदार दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील करासाठी पात्र ठरतील. योजनेचे व्यवस्थापन धर्मेश कक्कर, मनीष बांठिया, अखिल कक्कर, शर्मिला डीसिल्वा आणि गौरव चिकणे हे सांभाळणार आहेत.