नवी दिल्ली : आयडीबीआय बँकेच्या जवळपास अंतिम टप्प्यांत पोहोचूनही रखडलेल्या विक्री प्रक्रियेत दोन संभाव्य खरेदीदारांकडून आलेली ‘राखीव किमतीपेक्षा’ कमी आलेली बोलीची रक्कम हेच कारण असल्याचे दिसत असून, यावर उपाय म्हणून सरकार आता त्यांच्याकडून सुधारित आर्थिक बोली मागवेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
तीन वर्षांहून अधिक काळ खोळंबलेल्या, आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीची प्रक्रिया आर्थिक बोलीच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे, आणखी विलंब टाळण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीची प्रक्रिया सध्या तांत्रिक मूल्यमापनाच्या टप्प्यावर आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आखाती देशांमधील संकटमय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जागतिक अनिश्चिततेपासून अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांना आर्थिक बळ देण्यासाठी, सरकारने ‘निर्गुंतवणूक’ आणि ‘मालमत्ता रोखीकरणावर’ जोर दिला आहे.
केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी हे दोघे मिळून आयडीबीआय बँकेतील ६०.७२ टक्के हिस्सा विकणार आहेत. त्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी आर्थिक बोली प्राप्त झाल्या. त्यानंतर, सरकारने या धोरणात्मक विक्रीसाठी राखीव किंमत निश्चित केली.
तथापि, आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीसाठी प्राप्त झालेल्या आर्थिक बोलींची रक्कम, ही अर्थ मंत्रालयातील सचिवांच्या नेतृत्वाखालील निर्गुंतवणूक विषयक आंतर-मंत्रालयीन गटाने निश्चित केलेल्या राखीव किमतीपेक्षा कमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे, आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीच्या प्रक्रियेत पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे.
प्रेम वत्स यांच्या नेतृत्वाखालील ‘फेअरफॅक्स’ आणि दुबईस्थित ‘एमिरेट्स एनडीबी’ या संस्थांनी आयडीबीआय बँकेच्या धोरणात्मक विक्रीसाठी बोली सादर केल्याचे वृत्त आहे. सध्या, सरकार आणि एलआयसी या दोघांकडे मिळून आयडीबीआय बँकेचा ९४.७१ टक्के हिस्सा आहे. यापैकी ४५.४८ टक्के हिस्सा सरकारकडे, तर ४९.२४ टक्के हिस्सा एलआयसीकडे आहे.
‘आयडीबीआय’चा शेअर गाळात
मंगळवारच्या सत्रात आयडीबीआय बँकेचा समभाग ६९.७४ रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे ७४,८७९ कोटींचे बाजार भांडवल आहे. ५२ आठवड्याच्या कालावधीत समभागाने ११८.३८ रुपयांची उच्चांकी गाठली होती. गेल्या महिन्याभरात बँकेने उणे ३६.०५ टक्के तर तीन महिन्यांच्या कालावधीत उणे ३२.३८ टक्के परतावा दिला आहे. तर वर्षभरात नकारात्मक ५.३० टक्के परतावा दिला आहे.
