Impact Of Repo Rate Cut On Fixed Deposits: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी रेपो दरात पाव टक्क्यांची २५ बेसिस पॉइंट्सची कपात करून तो ५.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये धोरणात्मक भूमिका तटस्थ ठेवत रेपो दर कपातीचा निर्णय समितीने एकमताने घेतला.
रेपो दरामध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात झाल्यामुळे गृहकर्जाचे व्याजदरही कमी होण्याची शक्यता आहे. अनेक बँकांनी त्यांच्या बेंचमार्क-लिंक्ड कर्जदरांमध्ये कपात करण्याची घोषणा आधीच केली आहे. याचा अर्थ असा की नवीन कर्जदार तसेच फ्लोटिंग रेट गृहकर्ज असलेले कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना रेपो दर कपातीचा फायदा होईल.
एकीकडे विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर कमी होणार आहेत. तर दुसरीकडे मुदत ठेवींमध्ये (FD) गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना रेपो दर कपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बऱ्याच बँकांनी ऑक्टोबरपर्यंतच त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर कमी केले होते. अशा स्थितीत, आज रेपो दरात झालेल्या नव्या कपातीमुळे बँका आणि लघु वित्त बँका (स्मॉल फायनान्स बँका) पुन्हा एकदा मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करतील, अशी अपेक्षा आहे.
“ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून, रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केल्याने मुदत ठेवी आणि इतर व्याजदर असलेल्या बचतींवरील कमी होत चाललेल्या परताव्यांबाबत चिंता निर्माण होईल”, असे गोल्डन ग्रोथ फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुर जालान यांनी म्हटल्याचे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
जालान पुढे म्हणाले की, “येत्या काही महिन्यांत बँका मुदत ठेवींचे दर कमी करतील, ज्यामुळे ठेवीदारांना चांगला परतावा मिळवणे कठीण होईल.” यावेळी त्यांनी असेही नमूद केले की, कमी व्याजदरांमुळे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणारे श्रीमंत गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी इतर पर्यायांचा विचार करतील.
रेपो दर कपातीनंतर बँका साधारणपणे मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करतात, कारण त्यांच्या निधीच्या एकूण खर्चात घट होते. परंतु ही कपात नेहमीच आरबीआयच्या कपातीइतकी नसते. २५ बेसिस पॉइंट्सची कपात झाली म्हणजे बँका मुदत ठेवींवरील व्याजदरही त्याच फरकाने कमी करतीलच, असे नाही.
