Gold Silver ETF Sharp Decline India: सोने आणि चांदीच्या एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये (ईटीएफ) २ फेब्रुवारी रोजी (आज) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या किमती सतत घसरत असल्याचा दोन्ही मौल्यवान धातूंच्या ईटीएफवरही परिणाम होत आहे.

विश्लेषकांनी म्हटले आहे की, बाजारातील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेअर बाजारात नकारात्मक व्यवहार होत आहेत आणि याचा सोने आणि चांदीच्या ईटीएफवर परिणाम होत आहे.

सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वरील एप्रिल एक्सपायरीचे सोन्याचे वायदे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास ३ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,४३,३३५ रुपयांवर आले. गुरुवारी प्रति १० ग्रॅम १,९३,०९६ रुपयांच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर ही २६ टक्के (सुमारे ५०,००० रुपये) घसरण झाली आहे. दरम्यान, जून आणि फेब्रुवारी एक्सपायरीचे सोन्याचे वायदे अनुक्रमे ४ टक्क्यांहून अधिक आणि सुमारे ३ टक्क्यांनी घसरले.

दरम्यान, मार्च एक्सपायरीचे चांदीचे वायदे ६ टक्क्यांनी घसरून २,४९,७१३ रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत. गुरुवारी ४,२०,०४८ रुपये प्रति किलोग्रामच्या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर ही सुमारे ४१ टक्के (१,७०,३३५ रुपये) इतकी मोठी घसरण आहे. मे महिन्यात मुदत संपणारे करारही ६ टक्क्यांनी घसरून २,६५,५०२ रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत.

सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये घसरण

गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्ये नुकतीच सुरू झालेली घसरण आजही सुरूच आहे.

एडलवाईस सिल्व्हर ईटीएफ २० टक्क्यांनी घसरून २१०.६१ रुपयांवर पोहोचला आहे. अ‍ॅक्सिस सिल्व्हर ईटीएफमध्येही २० टक्के घसरण झाली, तर यूटीआय सिल्व्हर ईटीएफ, डीएसपी सिल्व्हर ईटीएफ, आदित्य बिर्ला सन लाईफ सिल्व्हर ईटीएफ, कोटक सिल्व्हर ईटीएफ आणि इतर काही ईटीएफ प्रत्येकी २० टक्क्यांनी घसरले आहेत.

मिरे अ‍ॅसेट सिल्व्हर ईटीएफ, मोतीलाल ओसवाल सिल्व्हर ईटीएफ, ३६० वन सिल्व्हर ईटीएफ, एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ आणि इतर काही शेअर्स जवळजवळ १९ टक्क्यांनी घसरले, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल सिल्व्हर ईटीएफ, निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएफ, एसबीआय सिल्व्हर ईटीएफ, टाटा सिल्व्हर ईटीएफ प्रत्येकी १८ टक्क्यांनी घसरले आहेत.

गोल्ड ईटीएफमध्ये बिर्ला सन लाईफ गोल्ड ईटीएफ आणि मोतीलाल ओसवाल गोल्ड ईटीएफ प्रत्येकी ९ टक्क्यांहून अधिक घसरले, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ, मिरे अ‍ॅसेट गोल्ड ईटीएफ आणि इतर प्रत्येकी ८ टक्क्यांनी घसरले आहेत. एडलवाईस गोल्ड ईटीएफ, एचडीएफसी गोल्ड ईटीएफ, बडोदा बीएनपी परिबास गोल्ड ईटीएफ, निप्पॉन इंडिया ईटीएफ (गोल्डबीज) आणि इतर काही कंपन्यांचे शेअर्सही लक्षणीयरीत्या घसरले आहेत.