‘Kar Saathi’ featuring an AI-powered assistant to simplify direct tax processes: आयकर विभागाने गुरुवार, २ एप्रिल रोजी ‘कर साथी’ (Kar Saathi) नावाची एक नवीन वेबसाइट सुरू केली आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही वेबसाइट वापरण्यास अत्यंत सोपी असून, ती प्रत्यक्ष कराशी (Direct Tax) संबंधित प्रक्रिया अधिक सुलभ करते. तसेच, ती आयकराशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते.

एक्स या सोशल मीडिया साईटवर याचा याचा एक व्हिडिओ पोस्ट करत, आयकर विभागाने लिहिले की, “आयकर विभागाची नवीन वेबसाइट आता उपलब्ध आहे. ती वापरण्यास अधिक सोपी आणि हाताळण्यास अधिक वेगवान आहे. करदात्यांना आता आयकराशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ‘कर साथी’ला भेट द्या. हा तुमचा असा AI सहकारी आहे जो प्रत्यक्ष कराशी संबंधित तुमचा प्रवास अधिक सुलभ करण्यास मदत करेल.”

या नव्या वेबसाईटबाबत प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले “ITR हंगामाच्या अगदी आधी आणखी एक अद्ययावत आवृत्ती (अपग्रेड) जारी करण्यात आली आहे. आशा आहे की, यावेळी तरी ‘प्रगतीपथावर’ (Work in progress) असे मेसेजेस पाहायला मिळणार नाहीत.”

आयकर विभागाने स्पष्ट केले की, ही वेबसाईट सर्वसमावेशक आणि करदात्यांसाठी सुलभ (User friendly) ठरेल अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे. तसेच ती डेस्कटॉप, मोबाईल फोन आणि टॅब्लेट यांसारख्या विविध उपकरणांवरून वापरता येईल.

आयकर विभागाने नमूद केले की, या वेबसाईटवर ‘कर कायदे आणि नियम’, ‘करविषयक माहिती आणि सेवा’ आणि ‘करविषयक ई-सेवा’ अशा विविध श्रेणींमध्ये विभागलेले एकत्रित टॅब्स उपलब्ध आहेत. यामुळे करदात्यांना सर्व संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळवणे शक्य होते.

यामध्ये ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ (FAQs), आंतरराष्ट्रीय करविषयक संसाधने, कर दिनदर्शिका (Tax Calendar), परिपत्रके व अधिसूचना, तसेच आयकर तरतुदींविषयीची सविस्तर माहिती यांसारख्या मार्गदर्शक साधनांचाही समावेश करण्यात आला आहे.

शिवाय, या वेबसाईटवर ‘कर साथी’ (Kar Saathi) नावाचा एक ‘एआय’ (AI) सहाय्यक उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून करदाते करविषयक कोणतेही प्रश्न, हिंदी किंवा इंग्रजीत विचारू शकतात आणि त्यावर त्वरित उत्तरे मिळवू शकतात.

गेल्या महिन्यात, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी एका कार्यक्रमादरम्यान ‘कर साथी’चा विशेष उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, “हा ‘एआय’ चॅटबॉट आयकर विभागाच्या वेबसाईटद्वारे करदात्यांना २४ तास सहाय्य करेल.”