मुंबई : आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढून ४.२ अब्ज डॉलर म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ०.५ टक्के राहिली. मागील वर्षी याच काळात ती ३.४ अब्ज डॉलर (जीडीपीच्या ०.४ टक्के) इतकी होती, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आली.

वस्तू व्यापारातील तूट वाढणे हे चालू खात्यावरील तूट वाढण्यामागील प्रमुख कारण ठरले. वर्ष २०२६-२७च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) वस्तू व्यापार तूट ८६.१ अब्ज डॉलर झाली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ती ६८.९ अब्ज डॉलर होती. मात्र, सेवाक्षेत्रातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नातील वाढीमुळे चालू खात्यातील तूट मर्यादित राहण्यास मदत झाली.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सेवा क्षेत्रातील निव्वळ प्राप्ती २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत वाढून ५१.६ अब्ज डॉलर झाली, जी मागील वर्षी ४७.९ अब्ज डॉलर होती. संगणक सेवा, इतर व्यावसायिक सेवा आणि वाहतूक सेवा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांतील सेवा निर्यातीत वर्षभराच्या तुलनेत वाढ झाल्याचे मध्यवर्ती बँकेने नमूद केले.

परदेशातून येणाऱ्या पैशांतही वाढ

परदेशात नोकरी-पेशा करणाऱ्या भारतीयांकडून मायदेशात पाठविल्या जाणाऱ्या (रेमिटन्स) पैशांमध्येही लक्षणीय वाढ होऊन ती ४२.९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ही रक्कम ३३.२ अब्ज डॉलर होती.

थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला दरम्यान, पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) निव्वळ ओघही वाढला आहे. एप्रिल-जून २०२६ या कालावधीत ६.१ अब्ज डॉलरची निव्वळ थेट परकीय गुंतवणूक झाली. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा आकडा ५.२ अब्ज डॉलर होता.