मुंबई: एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांनी मुंबईतील इजिप्तच्या वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने डब्ल्यूटीसी मुंबई येथे इजिप्तशी व्यवसायाच्या संधी या विषयावर नुकतेच संवादात्मक सत्राचे आयोजन केले होते.इजिप्त आणि भारताचे दीर्घकालीन ऐतिहासिक द्विपक्षीय संबंध असून जून २०२३ मध्ये स्वाक्षरी केलेला सामरिक भागीदारी करार आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित इजिप्त-भारत सामरिक संवादाच्या पहिल्या फेरीमुळे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, फिनटेक, स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ झाले आहे, असे मुंबईतील इजिप्तच्या वाणिज्य दूत, डाहलिया मोहम्मद नाझीह मोहम्मद तवाकोल यांनी सांगितले.

या परिषदेत दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार येत्या काही वर्षांत १२ अब्ज डॉलरवर नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भारत आणि इजिप्त द्विपक्षीय व्यापार सुमारे ५ अब्ज डॉलरवर पोहोचला असून, २०३० पर्यंत १२ अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा गाठेल, असा विश्वास वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री म्हणाले.

भारत आणि इजिप्तमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यासाठी मोठी संधी आहे. अशा संवादात्मक उपक्रमांमुळे व्यापार संवाद मजबूत होण्यास आणि अधिक सखोल व्यावसायिक भागीदारी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते, असे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईच्या व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन संचालिका प्रिया पानसरे म्हणाल्या.इजिप्त लहान आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्नशील असून अनुकूल व्यवसाय आणि गुंतवणूक वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

हा देश नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन, पर्यटन आणि आतिथ्य, कृषी आणि कृषी-व्यवसाय, आयटी सेवा आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, उत्पादन, औषधनिर्माण, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देतो. गुंतवणूक, औद्योगिक विस्तार आणि निर्यात-केंद्रित वाढ सुलभ करण्यासाठी इजिप्तने ९५ हून अधिक औद्योगिक मुक्त क्षेत्रे स्थापन केली आहेत, असे डाहलिया यांनी सांगितले.