पीटीआय, नवी दिल्ली : केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२६) ७.१४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अर्थसंकल्पात निर्धारित वार्षिक लक्ष्याच्या तुलनेत ती ४२.१ टक्के नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ३६.५ टक्के होती. सरकारने शुक्रवारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ४.३ टक्के म्हणजेच १६.९६ लाख कोटी रुपयांचे वित्तीय तुटीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सरकारी महसूली उत्पन्न आणि एकूण खर्च यांमधील तफावत म्हणजे वित्तीय तूट होय. महसुली उत्पन्नाच्या तुलनेत सरकारच्या खर्चाचा वेग अधिक असल्याने वित्तीय तूट वाढली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत केंद्र सरकारचा एकूण खर्च वार्षिक तुलनेत १०.७ टक्क्यांनी वाढला. याउलट कर्जाव्यतिरिक्त मिळणाऱ्या उत्पन्नात ६.१ टक्क्यांची वाढ झाली.
पायाभूत सुविधा विकासावरील खर्चाचा वेग कायम ठेवत, सहामाहीत सरकारचा भांडवली खर्च १२.७ टक्क्यांनी वाढून ६.५५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. संपूर्ण वर्षासाठी भांडवली खर्चाचे उद्दिष्ट १२.२२ लाख कोटी रुपयांचे आहे. त्यापैकी ५३.६ टक्के निधी पहिल्या सहा महिन्यांत खर्च करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत वार्षिक तरतुदीच्या तुलनेत हा खर्च ५१.८ टक्के होता.
सरकारच्या महसुली उत्पन्नात ३.६ टक्क्यांची वाढ होऊन ते १७.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. निव्वळ करसंकलन ३.८ टक्क्यांनी वाढून १२.७६ लाख कोटी रुपये झाले. करेतर महसुलातही ३.१ टक्क्यांची वाढ झाली असून, ते ४.८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, करेतर महसुलाने वार्षिक उद्दिष्टाच्या ७२.२ टक्के टप्पा पहिल्या सहामाहीतच गाठला आहे.
कर्जाव्यतिरिक्त भांडवली जमा दुपटीहून अधिक वाढून ७८,६०२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ३४,७७० कोटी रुपये होती. निर्गुंतवणुकीतून मिळणाऱ्या रकमेसह अन्य उत्पन्न ६२,१५९ कोटी रुपये झाले. हे वार्षिक उद्दिष्टाच्या ७७.७ टक्के आहे. आयडीबीआय बँकेतील सरकारचा हिस्सा विक्रीचा व्यवहार चालू आर्थिक वर्षात पूर्ण झाल्यास निर्गुंतवणुकीचे उद्दिष्टही ओलांडले जाईल.
अनुदानाच्या खर्चात वाढ
अन्न आणि खत अनुदानासह सरकारचा प्रमुख अनुदानांवरील एकूण खर्च पहिल्या सहामाहीत १०.१ टक्क्यांनी वाढून २.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. मागील वर्षी याच कालावधीत हा खर्च २.०२ लाख कोटी रुपये होता. अन्न अनुदानावरील खर्च १६ टक्क्यांनी वाढून १.०३ कोटी रुपयांवर गेला. गेल्या वर्षी याच कालावधीत हा खर्च ८८,३७५ कोटी रुपये होता. खत अनुदानावरील खर्चात ११.२ टक्क्यांची वाढ झाली. युरिया अनुदानासाठी ८५,५८६ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, वार्षिक तरतुदीच्या ७३ टक्के रक्कम पहिल्या सहामाहीतच वापरण्यात आली आहे. पोषक तत्त्वांवर आधारित खत अनुदानासाठी ३३,६६४ कोटी रुपये खर्च झाले. हे वार्षिक तरतुदीच्या ६२ टक्के आहे. २०२६-२७ साठी सरकारने अनुदानांकरिता ४.११ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या सहा महिन्यांत ५४ टक्के निधी खर्च झाला आहे.
