मुंबई: एक प्राथमिक उत्पादक देश ते उच्च-मूल्याचे जागतिक प्रक्रिया केंद्र म्हणून वेगाने होत असलेल्या भारताच्या विकासाच्या पार्श्वभूमीवर, देशाच्या अन्न व कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारे ‘अनुगा सिलेक्ट इंडिया’ आणि ‘अनुगा फूडटेक इंडिया २०२६’ या जुळ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांना मंगळवारी मुंबईत गोरेगाव येथे सुरुवात झाली. १ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन जर्मनी, नेदरलँड्स आणि भारताच्या केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. प्रदर्शनात ४३ देशांमधील ११०० हून अधिक प्रदर्शक आणि ५०,००० हून अधिक व्यावसायिक सहभागी झाले आहेत. खाद्य घटक, तयार अन्न, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि ऑटोमेशनपर्यंतची संपूर्ण अन्न मूल्य साखळी यात सामावली आहे.
भारताची अन्न बाजारपेठ ५५० ते ६०० अब्ज डॉलरच्या दिशेने वाटचाल करत असून, ती ६ ते ७ टक्क्यांच्या वार्षिक दराने प्रगती करत आहे. कृषी निर्यातीने सध्याच्या ५३ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडून मूल्यवर्धनाद्वारे ती दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय सरकारने ठेवले आहे. युरोपीय महासंघाशी मुक्त व्यापारांतर्गत प्रचंड बाजारपेठ संधी खुली होणार आहे. यामुळे भारताच्या मत्स्यव्यवसाय, चहा, कॉफी आणि मसाल्यांच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार असून, ९६ टक्क्यांहून अधिक द्विपक्षीय व्यापारावरील आयात शुल्क कमी होणार आहेत. युरोपीय महासंघ हे या प्रदर्शनाचे अधिकृत भागीदार क्षेत्र असून, त्यांची विशेष दालने प्रदर्शनात आहेत.
