मुंबई: रिझर्व्ह बँकेचा परकीय चलनसाठा तीव्रतेने आटत असून, दोन महिन्यांत त्यात जवळपास ६६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी ७८५.७०६ अब्ज डॉलर या विक्रमी उच्चांकावर असलेला देशाचा परकीय चलनसाठा ३० ऑक्टोबरपर्यंत घसरून ७१९.७४८ अब्ज डॉलरवर आला आहे. म्हणजेच या अवधीत तो सुमारे ६५.९६ अब्ज डॉलरने घटला आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री जोरकसपणे सुरू असल्याकडे यातून लक्ष वेधले जात आहे.
विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अलीकडेच रुपयाला आधार देण्यासाठी परकीय चलनसाठा उधळू नये, असा सल्ला दिला होता. रुपयाची विशिष्ट पातळी टिकवून ठेवण्याचा अट्टहास करण्यापेक्षा अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ताज्या स्थितीत राजन यांच्या इशाऱ्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनसाठ्यात १.२६ अब्ज डॉलरची घट होऊन तो ७१९.७४ अब्ज डॉलरवर आला. यापूर्वीच्या आठवड्यातही साठ्यात ५.०१ अब्ज डॉलरची घट झाली होती. या वर्षी अनिवासी भारतीयांच्या परकीय चलनातील (एफसीएनआर) ठेवी आकर्षित करण्यासाठी विशेष सवलतीच्या व्यवस्थेद्वारे बँकांनी विक्रमी सुमारे १३३ अब्ज डॉलर उभारले होते. या ठेवींच्या माध्यमातून मिळालेल्या परकीय चलनाचा काही भाग रुपयाला आधार देण्यासाठी वापरला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रुपयाला आधार देण्यासाठी डॉलरची विक्री
पयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री हे परकीय चलनसाठ्यातील घटीमागील तज्ज्ञांचे मते प्रमुख कारण आहे. डॉलरची मागणी वाढून रुपयावर दबाव निर्माण झाल्यास रिझर्व्ह बँक बाजारात डॉलरची विक्री करते. त्यामुळे रुपयातील अस्थिरता कमी करण्यास मदत होते.
सोन्याच्या साठ्याच्या मूल्यातही घट
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, परकीय चलनसाठ्यातील प्रमुख घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत १.३५ अब्ज डॉलरची वाढ होऊन ती ५९३.२० अब्ज डॉलरवर पोहोचली. मात्र, सोन्याच्या साठ्याच्या मूल्यात २.६५ अब्ज डॉलरची घट होऊन ते १०३.१५ अब्ज डॉलरवर आले. परकीय चलन मालमत्तेच्या डॉलरमधील मूल्यावर युरो, पौंड आणि येन यांसारख्या अन्य चलनांच्या विनिमय दरातील चढ-उतारांचाही परिणाम होतो.
परकीय चलनसाठ्यातील घटीची आकडेवारी
तपशील परकीय चलनसाठा
४ सप्टेंबर २०२६ ७८५.७०६ अब्ज डॉलर
३० ऑक्टोबर २०२६ ७१९.७४८ अब्ज डॉलर
एकूण घट ६५.९५८ अब्ज डॉलर
घटीचे प्रमाण सुमारे ८.४ टक्के
