पीटीआय, नवी दिल्ली

भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के नोंदविण्यात आला, जो संपूर्ण आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेसाठी सुचिन्हच ठरेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी व्यक्त केला.

सीतारामन या ‘जी-२०’ परिषदेशी निगडित बैठकीसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तेथून समाजमाध्यमावरील टिप्पणी करत त्यांनी विकासदरावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या विकासदराची आकडेवारी काल जाहीर झाली. जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल असा भारताने ७.८ टक्के वाढीचा दर नोंदविला. जागतिक पातळीवर आव्हाने असतानाही भारताने ही कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत झालेली ही वाढ पुढे संपूर्ण आर्थिक वर्षात दिसून येईल.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सर्वच क्षेत्रांत दिसून येत आहे. निर्मिती क्षेत्राच्या वाढीचा दर ९.२ टक्के असून, व्यावसायिक सेवा क्षेत्राची वाढ १२.१ टक्के आहे. भारताची परकीय गंगाजळी सध्या ७०० अब्ज डॉलरच्या आसपास आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय नागरिकांचे योगदान आणि सरकारचे दीर्घकालीन विकासाचे उद्दिष्ट यामुळे विकास दरात भरीव वाढ दिसून येत आहे. भारतीय नागरिकांचे परिश्रमही यातून दिसून येत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ साकाण्याच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले.

अंदाजापेक्षा सरस कामगिरी

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत विकास दर ७ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तविला होता. प्रत्यक्षात पहिल्या तिमाहीत विकास दराची कामगिरी यापेक्षा सरस राहिली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेचा ६.७ टक्क्यांचा अंदाज आहे. आता अर्थमंत्र्यांनी पहिल्या तिमाहीप्रमाणेच संपूर्ण आर्थिक वर्षात विकास दर राहील, असे भाकीत केले आहे. चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीची विकासदराची आकडेवारी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.