वृत्तसंस्था, नवी दिल्ली : नवीन कार्यादेशात घट झाल्याने देशातील निर्मिती क्षेत्राने सरलेल्या ऑगस्ट महिन्यात पाच वर्षांतील सर्वात कमी वाढ नोंदवल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले. अर्थव्यवस्थेचे इंजिन मानल्या जाणाऱ्या या क्षेत्राला सलग तिसऱ्या महिन्यात घरघर लागल्याचे दिसले आहे.
देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या एचएसबीसी इंडियाद्वारे या क्षेत्रातील खऱेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारित ‘पीएमआय निर्देशांक’ ऑगस्ट महिन्यात ५२.८ गुणांवर नोंदविण्यात आला. त्याआधीच्या महिन्यात (जुलै) हा निर्देशांक ५३.५ गुणांवर नोंदविला गेला होता. म्हणजे ५४.२ या दीर्घकालीन सरासरी खाली हा निर्देशांक मागील सलग तीन महिन्यांत नोंदविला गेला आहे. या महिन्यात तर त्याने ऑगस्ट २०२१ नंतरच्या नीचांकी पातळीला गाठले आहे. हा निर्देशांक ५० गुणांवर असल्यास विस्तापूरकता तर ५० गुणांखाली असल्यास आकुंचन दर्शवतो.
गेल्या महिन्यात निर्मिती क्षेत्रातील रोजगार निर्मितीचा वेगही मंदावला आहे. दोन वर्षांहून अधिक काळात प्रथमच रोजगार निर्मितीत घट झाली आहे. कच्च्या मालाच्या किमतीचा दबाव कमी होत असून, कंपन्यांकडून उत्पादनांच्या किमतीतील वाढीचा दर मध्यम पातळीवर आला आहे. नवीन व्यवसायातील वाढीचा दर अपेक्षित असला तरी विस्ताराचा वेग पाच वर्षांतील नीचांकी ठरला आहे. बाजारपेठेतील आव्हानात्मक स्थिती आणि काही उत्पादनांच्या मागणीतील घट ही कारणे यामागे आहेत.
देशातील निर्मिती क्षेत्राचा वेग ऑगस्ट महिन्यात मंदावत त्याने पाच वर्षांतील नीचांकी पातळी गाठली आहे. उत्पादन आणि नवीन कार्यादेशात झालेली घट यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरली आहे. रोजगार निर्मितीतील वाढीचा दरही गेल्या महिन्यात कमी नोंदविण्यात आला. – प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया
