India-Pakistan Trade: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत कठोर भूमिका स्वीकारली होती. याचाच भाग म्हणून भारताने सीमा बंद केल्या होत्या. याचबरोबर सिंधू जल करारालाही स्थगिती दिली होती. त्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्याने पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता.
यामुळे दोन्ही देशांमध्ये चार दिवस लष्करी संघर्ष चालला होता. दरम्यान, इतक्या मोठ्या घडामोडी घडूनही मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार कायम राहिला आहे. हा व्यापार प्रामुख्याने तिसऱ्या देशांद्वारे झाला आहे.
अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मे ते जुलै दरम्यान भारतातून पाकिस्तानात होणारी निर्यात तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, असे डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीचा हवाला देत वृत्त दिले आहे.
या आकडेवारीतून असे दिसून आले की, आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या ११ महिन्यांत भारतातून पाकिस्तानमध्ये एकूण २११.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची निर्यात झाली आहे. ही निर्यात आर्थिक वर्ष २४ मध्ये २०७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि आर्थिक वर्ष २३ मध्ये १९० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होती.
दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान यांच्यात चार दिवस लष्करी संघर्ष झाला. त्यानंतरही मे महिन्यात भारताने पाकिस्तानात १५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली होती, जी गेल्या वर्षी मे महिन्यात सुमारे १७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स होती.
दुसरीकडे, या कालावधीत पाकिस्तानातून भारतात झालेली आयात खूप नगण्य आहे. मे महिन्यात भारतात पाकिस्तानमधून केवळ १,००० अमेरिकन डॉलर्स इतकी आयात झाली आहे. तर मे-जुलै आर्थिक वर्ष २५ दरम्यान एकूण निर्यात फक्त ०.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
आर्थिक वर्ष २४ आणि आर्थिक वर्ष २३ मध्ये पाकिस्तानातून भारतात झालेली आयात अनुक्रमे ३.४४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि ०.३३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
२०१९ पासून पाकिस्तान आणि भारत यांच्यातील औपचारिक व्यापार संबंधांना फटका बसला आहे. पण २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काही प्रकारच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणारी अटारी लँड-ट्रान्झिट पोस्ट तात्काळ बंद केली होती.
याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही जाहीर केले होते की, “ते भारतासोबतचा सर्व व्यापार तात्काळ स्थगित करत आहेत.”
अधिकृत आकडेवारीतून भारत-पाकिस्तान यांच्यात मर्यादित व्यापार झाल्याचे दिसते. परंतु काही संशोधन संस्थांचा असा दावा आहे की दोन्ही देशांतील प्रत्यक्ष व्यापार खूपच जास्त आहे. “भारताची पाकिस्तानला होणारी अनधिकृत निर्यात दरवर्षी १० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे, जी प्रामुख्याने दुबई, कोलंबो आणि सिंगापूरमधून होते,” असे डॉनने एका संशोधन संस्थेच्या हवाल्याने म्हटले आहे.