जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊनही, पेट्रोल-डिझेलच्या विक्री दरात वाढ करण्याची कोणतीही तात्काळ योजना नसल्याचेही केंद्र सरकारने गुरुवारी सूचित केले. किंबहुना गेल्या चार वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ न केलेला भारत हा एकमेव देश आहे, असे तेलमंत्रालयाने म्हटले आहे.प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ ते २८ रुपयांची वाढ होईल, अशा शक्यता वर्तवणाऱ्या वृत्ताचे खंडन करताना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने समाजमाध्यमाद्वारे, किंमत वाढीचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे सांगितले.

गेल्या जवळपास चार वर्षांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर गोठवून ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर सुमारे २० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर साधारणपणे १०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.गेल्या काही दिवसांत खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय दर आणि एलपीजीचे दर अत्यंत अस्थिर राहिले आहेत.

असे असूनही, सरकारने इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. इराण युद्धाआधी खनिज तेलाचे दर पिंपामागे सरासरी ७० डॉलरवर होते, तर मार्च-एप्रिल महिन्यात ही सरासरी ११३ डॉलरपेक्षा अधिक राहिली आहे, असे पश्चिम आशियातील घडामोडींविषयी आयोजित एका पत्रकार परिषदेत, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले.

किमती प्रचंड वाढूनही केंद्र सरकारने इंधनदरात वाढ केलेली नाही. एप्रिल २०२२ च्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मधल्या कालावधीत तेलाच्या किमती काही महिन्यांत वाढल्या, तर काही प्रसंगी त्या कमी झाल्या. किमती कमी झाल्या, तेव्हा सरकारी तेल कंपन्यांनी चांगला नफा कमावला आणि जेव्हा दर वाढले, तेव्हा होणारा तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी त्या नफ्याचा वापर केला आहे.

तेलाच्या वाढत्या किंमतींचा बोजा ग्राहकांवर पडू नये, या उद्देशाने सरकारने गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात प्रत्येकी १० रुपयांची कपात केली होती. त्याचबरोबर, तेल शुद्धीकरण कंपन्यांना देशांतर्गत विक्रीला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, इंधनाच्या निर्यातीवरही कर वाढवला आहे, असेही सुजाता शर्मा म्हणाल्या.

एलपीजी दरातही अत्यल्प वाढ

एलपीजीच्या किंमती ठरवण्यासाठीचा निकष ‘सौदी सीपी’मध्ये १०२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असली, तरी देशांतर्गत स्वयंपाकाच्या गॅसचे दर मात्र जुलै २०२३ ते एप्रिल २०२६ या कालावधीत १७ टक्क्यांनी कमी झाले आहेत. आगामी काळात खनिज तेल पिंपामागे १२० डॉलरच्या आसपास स्थिर राहिल्यास, पेट्रोल-डिझेलमध्ये प्रति लिटर २५ ते २८ रुपयांची वाढ होईल, असा अंदाज कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालाने वर्तवला आहे. मात्र यावर टीका करताना, अशा प्रकारचे अहवाल हे नागरिकांमध्ये भीती आणि घबराट निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले असून, ते दुष्टबुद्धीने प्रेरित आणि दिशाभूल करणारे आहेत, असे तेलमंत्रालयाने म्हटले आहे.