नवी दिल्ली : अवघ्या काही तासांतच खात्रीशीर टपाल अथवा वस्तूच्या वितरणाची हमी देणाऱ्या तीन नवीन ‘प्रीमियम एक्सप्रेस वितरण सेवा’ सुरू करत असल्याचे भारतीय टपाल विभागाने मंगळवारी जाहीर केले. खासगी कुरिअर कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्यासाठी आणि ई-कॉमर्स क्षेत्राची गरज ओळखून या सेवा प्रस्तुत करण्यात आल्या आहेत.

या नवीन सेवांतर्गत तातडीच्या आणि वेळेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या टपालासाठी २४ तास आणि ४८ तासांत वितरणाची हमी दिली गेली आहे. ‘२४ स्पीड पोस्ट’, ‘२४ स्पीड पोस्ट पार्सल’ आणि ‘४८ स्पीड पोस्ट’ अशा या सेवांचा शुभारंभ केंद्रीय दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. टपाल विभागाच्या महसुलातील वाढ उत्साहवर्धक असून आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या ११ महिन्यांत विभागाने महसुलात २० टक्के वाढ नोंदवली आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात, या सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या सहा शहरांमध्ये सुरू होत आहेत. मार्च २०२७ पर्यंत देशभरात या सेवांचा विस्तार करण्याचे टपाल विभागाचे उद्दिष्ट आहे. वितरणाच्या निश्चित वेळेचे पालन करण्यासाठी विशेष प्रक्रिया केंद्रे आणि प्राधान्यक्रमावर आधारित हवाई वाहतूक व्यवस्थेचा टपाल विभाग वापर करणार आहे.

‘इंडिया पोस्ट’साठी एका नव्या पर्वाची सुरुवात असून, यातून विभागासाठी भविष्यातील प्रचंड संधींची दारे उघडली गेली आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील बाजारपेठेत २०३० पर्यंत मोठी वाढ अपेक्षित असून, सध्याच्या ११ लाख कोटी रुपयांवरून या क्षेत्राचा विस्तार ३० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

सध्या एकूण व्यवसायात पार्सल सेवेचा वाटा केवळ ५ टक्के आहे. परंतु, पार्सल सेवा हेच संस्थेच्या विकासाचे मुख्य इंजिन बनावे,असे सामूहिक उद्दिष्ट आहे. या वर्षाच्या (आर्थिक वर्ष २०२६) पहिल्या ११ महिन्यांत पार्सल व्यवसायात ४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, या विकासाच्या इंजिनला आणखी वेगाने पुढे न्यावे लागेल. एक परिपूर्ण आणि सक्षम ‘वितरण यंत्रणा’ म्हणून नावारूपाला येण्यापासून रोखले जाण्याचे कोणतेही कारण नाही असेही शिंदे यांनी नमूद केले.

या नवीन सेवांमध्ये ‘ओटीपी’द्वारे वितरणाची पडताळणी करण्याची सुविधा असेल. तसेच, टपालाच्या प्रवासावर सुरुवातीपासून ते वितरणापर्यंत संपूर्ण लक्ष ठेवण्याची (ट्रॅकिंग) व्यवस्था आणि त्यासोबतच टपालाच्या स्थितीबाबतची अद्ययावत माहिती देणारे ‘रिअल-टाइम’ एसएमएस अर्थात संदेश पाठवला जाणार आहे. वाणिज्य संस्थांसाठी या सेवांमध्ये ‘आता बुक करा, नंतर पैसे द्या’ (बीएनपीएल) पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.