मुंबईः विद्यमान जून महिन्यात देशातील खासगी क्षेत्राच्या वाढीचा वेग गेल्या तीन महिन्यांतील सर्वात कमी राहिला. उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांतील सुस्तीमुळे घडवून आणलेला हा परिणाम ताज्या सर्वेक्षणातून मंगळवारी पुढे आणला. उल्लेखनीय म्हणजे जूनमध्ये व्यावसायिक आत्मविश्वास दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमालीचा खाली घसरला, तर वस्तू उत्पादकांमधील सकारात्मक भावना ही गत चार वर्षांतील सर्वात कमी पातळीवर राहिल्याचे आढळून आले.

व्यावसायिक आत्मविश्वासाचा अभाव, तर मागणीतील वाढही मंदावल्याचा फटका हा खासगी क्षेत्राच्या सक्रियतेला बसला आहे. ‘एस अँड पी ग्लोबल’द्वारे संकलित केलेला ‘एचएसबीसी फ्लॅश इंडिया कंपोझिट परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ (पीएमआय) मे महिन्यातील ५९.३ वरून चालू महिन्यात ५७.४ पर्यंत खाली आला. पीएमआयची ५० पेक्षा जास्त पातळी आर्थिक हालचालींमधील विस्तार दर्शवते.

सेवा आणि निर्मिती क्षेत्राच्या स्वतंत्र कामगिरीकडे पाहिल्यास, सेवा क्षेत्राचा पीएमआय ५९.८ वरून ५७.३ पर्यंत असा १७ महिन्यांच्या नीचांकी घसरला, तर उत्पादन क्षेत्राचा पीएमआय गेल्या महिन्यातील ५५.० वरून जूनमध्ये ५४.५ पर्यंत असा तीन महिन्यांपूर्वीच्या पातळावर खाली आला.मागणीचे मुख्य निदर्शक असलेल्या नवीन कार्यादेशांमध्ये मार्चनंतरची सर्वात संथ वाढ दिसून आली. कंपन्यांमध्ये नवीन व्यवसाय मिळवण्याचा स्पर्धात्मक दबाव आणि एलपीजी व एलएनजी गॅसचा तुटवडा हे अडथळे प्रामुख्याने जाणवल्याचे सर्वेक्षणांत नमूद केले.

निर्यातीच्या आघाडीवर मिश्र चित्र दिसून आले. सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय विक्रीत थोडी अधिक वेगाने वाढ झाली. परंतु उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी मार्च २०२३ नंतर नवीन निर्यात कार्यादेशांमध्ये सर्वात कमी वाढ नोंदवली.मागणीतील या मंदीमुळे रोजगार निर्मितीवरही विपरित परिणाम दिसून आला. जूनमध्ये खासगी क्षेत्रातील रोजगारात नाममात्र वाढ झाली. जी मागील सहा महिन्यांच्या विस्तार काळातील सर्वात कमी वाढ होती. कारखाने व सेवा पुरवठादार या दोन्ही क्षेत्रांतील नवीन भरती डिसेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर होती.

मागणीची कठीण परिस्थिती पाहता अनेक कंपन्यांनी वाढलेला खर्च किमती वाढवून ग्राहकांवर लादणेही दुरापास्त ठरले. त्यामुळे कच्चा मालाच्या किमती आणि उत्पादन खर्चात वाढ होऊनही, विक्री किंमतीतील महागाईचा वेगही मंदावला. जूनमधील विक्री शुल्कातील वाढ गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी राहिली.