India Q1 GDP Growth Rate : मध्यपूर्वेतील संघर्ष, कच्च्या तेलाचे भडकलेले दर आणि पुरवठा साखळीतील अडथळे, या सर्व आव्हानानंतर भारतीय अर्थव्यवस्थेने जोरदार कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) देशाचं ढोबळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वृद्धीदर ७.८ टक्के राहिला आहे. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्तवलेल्या ७ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा हा कितीतरी अधिक आहे.
आरबीआयचा अंदाज ठरला चुकीचा
इराण-अमेरिका तणावामुळे जागतिक बाजारात वाढलेले इंधनाचे दर आणि देशांतर्गत वाढलेली घाऊक आणि किरकोळ महागाई यामुळे आर्थिक गती मंदावेल, असा अंदाज आरबीआयसह अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवला होता. ५ ऑगस्टच्या आपल्या आढाव्यात आरबीआयने पहिल्या तिमाहीसाठी ७ टक्के वाढीचा अंदाज बांधला होता. मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या या आकडेवारीने आरबीआयचा अंदाज चुकीचा ठरवला आहे.
एप्रिल-जून कालावधीतील जीडीपी वाढीचा दर जानेवारी-मार्चमधील ८.६ टक्के दरापेक्षा (जो आधीच्या ७.८ टक्क्यांवरून सुधारित करण्यात आला होता) कमी आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील (२०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीतील) ६.९ टक्के वाढीच्या तुलनेत तो अधिक आहे. २०२५ च्या मध्यपासून देशाचा आर्थिक वृद्धीदर आश्चर्यकारकरित्या वाढला आहे.
पुढील तिमाहींमध्ये विकासदर मंदावण्याची शक्यता
आरबीआयचा अंदाज चुकवत पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी केल्यानंतर अनेक अर्थतज्ज्ञ आता संपूर्ण वर्षासाठी विकासदर अंदाज वाढवत आहेत. असे असले तरी, आगामी काळात वाढीचा वेग काहीसा कमी होण्याचा अंदाज आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार, आगामी तिमाहींमध्ये दुसरी तिमाही (जुलै-सप्टेंबर) ६.४ टक्के, तिसरी तिमाही (ऑक्टोबर-डिसेंबर) ६.५ टक्के, चौथी तिमाही (जानेवारी-मार्च २०२७) ६.८ टक्के आणि पुढील वर्षाची पहिली तिमाही (एप्रिल-जून २०२७) ७.३ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. आरबीआयने संपूर्ण २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण जीडीपी वृद्धीदर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
जीडीपी आणि आर्थिक विकास दर म्हणजे काय?
जीडीपी (GDP) म्हणजे एका वर्षात देशाच्या सीमेमध्ये उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे एकूण बाजारमूल्य, तर आर्थिक विकास दर म्हणजे या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत झालेली टक्केवारीतील वाढ किंवा घट होय. मागील तिमाही किंवा वार्षिक कालावधीच्या तुलनेत चालू काळात जीडीपी किती टक्क्यांनी वाढला किंवा कमी झाला, याचे प्रमाण म्हणजे आर्थिक विकास दर होय. यावरुन देशाची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज येतो.
