Salary Hike In India 2026: भारतातील कॉर्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना २०२६ मध्ये सरासरी ९.१% वेतनवाढ देण्याची अपेक्षा आहे, असे ईवाय इंडियाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फ्युचर ऑफ पे या अहवालात म्हटले आहे. कोविड महामारीदरम्यान आणि त्यानंतर पाहायला मिळालेल्या तीव्र चढउतारांनंतर आता पगारवाढ अधिक स्थिर होत असल्याचे यावरून दिसून येते.
या अहवालात विविध उद्योगांतील वेतन प्रणाली आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यात आला असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही प्रतिभा व्यवस्थापन आणि वेतन ठरवण्याच्या निर्णयांमध्ये अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणार सर्वाधिक पगारवाढ
ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्समध्ये (जीसीसी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुढील वर्षी सर्वाधिक पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचा पगार सुमारे १०.४% वाढण्याचा अंदाज आहे. या ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्सना जागतिक स्तरावरील मजबूत मागणी आणि डिजिटल व विशेष कौशल्यांमध्ये सुरू असलेल्या गुंतवणुकीचा फायदा होत आहे.
त्यानंतर वित्तीय सेवा (फायनान्शिअल सर्विसेस) क्षेत्रात सुमारे १०% पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे. ई-कॉमर्स कंपन्या सुमारे ९.९% वाढ देऊ शकतात, तर लाईफ सायन्सेस आणि फार्मास्युटिकल्समध्ये सुमारे ९.७% वाढ होऊ शकते.
ट्रेंडवरून असे दिसून येते की तंत्रज्ञान, डिजिटल ऑपरेशन्स आणि जागतिक वितरण मॉडेल्सशी संबंधित क्षेत्रे पगारवाढीमध्ये सर्वात पुढे राहण्याची शक्यता आहे.
नोकरी बदलण्याचे प्रमाण घटण्याची चिन्हे
भरतीच्या बाबतीत कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. २०२५ मध्ये एकूण ॲट्रिशन दर (कर्मचारी नोकरी सोडण्याचे प्रमाण) १६.४% वर आला, जो मागील वर्षी १७.५% होता. कर्मचारी अजूनही नोकऱ्या बदलत असले तरी त्याचा वेग किंचित मंदावल्याचे दिसून येते.
८०% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने नोकऱ्या सोडल्या आहेत, याचा अर्थ बहुतेक लोक टाळेबंदीमुळे (ले ऑफ) नव्हे तर चांगल्या संधींसाठी नोकरी सोडत आहेत.
एआयमुळे वेतनात बदल
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेतन रचना आणि कर्मचाऱ्यांना रिवार्ड देण्याची पद्धत ठरवण्यात अधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सुमारे ५० ते ६०% मोठ्या कंपन्या आता पगार आणि बोनस नियोजनासाठी डेटा ॲनालिटिक्सचा वापर करत आहेत.
एआय, जनरेटिव्ह एआय, मशीन लर्निंग आणि अभियांत्रिकी यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रांतील पदांसाठी ४०% पर्यंत स्किल रिवार्ड मिळू शकतो. यावरून विशेष डिजिटल कौशल्यांसाठी असलेली मोठी मागणी स्पष्ट होते.

