पीटीआय, नवी दिल्ली – आर्थिक आकडेवारीतील अचूकतेसाठी २०२२-२३ या नव्याने निर्धारीत आधारभूत वर्षासह सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) नवीन मालिकेची आकडेवारी शुक्रवारी प्रसिद्ध केली जाईल. यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), ई-वाहन आणि स्वयंपाकी, चालक आणि घरगुती मदतनीसांनी प्रदान केलेल्या सेवांचा विदाही समाविष्ट असेल.
नवीन मालिकेवर आधारित तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५) जीडीपीची आकडेवारी, तसेच २०२५-२६ या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा दुसरा आगाऊ अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर केला जाईल.
गेल्या काही वर्षांत अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलांना प्रतिबिंबित करण्यासाठी आधारभूत वर्ष वेळोवेळी अद्ययावत केले जाते. आता नवीन आधार वर्ष २०११-१२ वरून २०२२-२३ असे सुधारण्यात आले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय दर पाच वर्षांनी विदा मालिकेत सुधारणा करत असले तरी, करोना महामारी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे ते आधी करता आले नाही. नवीन मालिकेत, अन-इन्कॉर्पोरेटेड सेक्टर एंटरप्राइजेसचे वार्षिक सर्वेक्षण आणि नियतकालिक कामगार दल सर्वेक्षणासारख्या नियमित वार्षिक सर्वेक्षणांचा वापर करून वास्तविक पातळीचे अंदाज तयार केले जात आहेत.
हे सर्वेक्षण घरगुती क्षेत्रातील गतिमानता अधिक अचूक आणि नियमितपणे मोजतील. रस्ते वाहतूक सेवांशी संबंधित खासगी अंतिम उपभोग खर्चाचा अंदाज लावण्यासाठी ई-वाहन संकेतस्थळावरील विदा वापरला जाईल. घरगुती कामगारांनी (जसे की स्वयंपाकी, ड्रायव्हर, घरकाम करणाऱ्या व्यक्ती इ.) भाड्याने घेतलेल्या श्रमकऱ्यांचे योगदान जीडीपीच्या अंदाजात समाविष्ट केले जाईल.

