Dubai Luxury Real Estate Investment Indian Celebrities: दुबई हे जागतिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा दुबईला मोठा फटका बसला आहे. या युद्धादरम्यान इराणने दुबईमधील काही ठिकाणांना लक्ष्य केल्याने दुबईत गुंतवणूक असलेले जागतिक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
दुबई (Dubai) हे शहर सध्या केवळ पर्यटनासाठीच नाही तर जगभरातील दिग्गज कलाकारांसाठी आणि खेळाडूंसाठी हक्काचे घर बनले आहे. पाम जुमेराह आणि जुमेराह गोल्फ इस्टेट्स यांसारख्या अति आलिशान भागांत भारतातील अनेक दिग्गजांनी मालमत्ता खरेदी केली आहे. यामध्ये क्रीडा, कला आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.
दुबईत गुंतवणूक असलेले भारतीय
शाहरुख खान
दुबईतील पाम जुमेराहच्या के-फ्रॉन्ड परिसरात अभिनेता शाहरुख खानचा सहा बेडरूमचा जन्नत नावाचा व्हिला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे १४,००० चौरस फूट आहे. हे घर नखील या विकासकाने शाहरुखला भेट म्हणून दिले होते.
या घराची अंतर्गत सजावट गौरी खान यांनी स्वतः खास पद्धतीने तयार करून घेतली आहे. या वास्तूमध्ये दोन रिमोट-कंट्रोल गॅरेज आणि एक खाजगी समुद्रकिनारा आहे.
मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मालकीचा पाम जुमेराह येथे एक अत्यंत आलिशान समुद्रकिनारी असलेला महाल आहे. या महालाची किंमत सुमारे १,३५० कोटी रुपये इतकी आहे.
या महालामध्ये १० भव्य बेडरूम्स, ७० मीटरचा केवळ त्यांच्यासाठीच राखीव असलेला खाजगी समुद्रकिनारा, तसेच घरातील आणि बाहेरील असे दोन्ही प्रकारचे स्विमिंग पूल आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन
जुमेराह गोल्फ इस्टेट्समध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या जोडप्याच्या मालकीचा ‘सँक्चुअरी फॉल्स व्हिला’ हा रिसॉर्ट शैलीतील व्हिला आहे.
या आलिशान व्हिलामधून ‘१८ होल’ चॅम्पियनशिप गोल्फ कोर्सचे विहंगम दृश्य दिसते. या व्हिलामध्ये अत्याधुनिक होम थिएटर आणि उच्च दर्जाचे ‘स्कॅव्होलिनी’ किचन आहे.
सानिया मिर्झा
दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाचा पाम जुमेराह येथे ग्रीक शैलीने प्रेरित समुद्रकिनारी वसलेला आलिशान व्हिला आहे. या घराची रचना पांढऱ्या आणि निळ्या रंगांच्या संयोजनावर आधारित असून, ते पाम जुमेराहच्या सर्वात सुरक्षित अशा ‘फ्रॉन्ड्स’पैकी एका भागात आहे.
सानिया मिर्झा गेल्या काही वर्षांपासून तिच्या मुलासह या व्हिलामध्ये राहते. पण, दुबईमध्ये (Dubai) झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे सानिया मिर्झा आपल्या मुलासह नुकतीच हैदराबादला परतली आहे.
संजय दत्त
‘गोल्डन व्हिसा’ प्राप्त करणाऱ्या पहिल्या काही भारतीयांपैकी एक असलेला संजय दत्त, त्याची पत्नी मान्यता आणि त्यांची मुले हे दुबईचे (Dubai) कायमस्वरूपी रहिवासी आहेत. ते आपले व्यावसायिक कामकाज दुबईतील एका आलिशान व्हिलामधून चालवतात.
