Indian CEO Forced To Leave Sweden Due To Immigration Issues: अभिजित नाग बालसुब्रमण्यम या भारतीय उद्योजकाने स्वीडनमध्ये अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांत एक स्टार्टअप उभारले आणि स्थानिक नोकऱ्या निर्माण केल्या. परंतु ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, अभिजित नाग बालसुब्रमण्यम यांना कठोर इमिग्रेशन कायद्यांमुळे त्यांची कंपनी विकून भारतात परतावे लागले.
एका लिंक्डइन पोस्टमध्ये अभिजित यांनी म्हटले आहे की, त्यांची ही ‘एक्झिट’ त्यांच्या इच्छेनुसार नसून स्वीडिश मायग्रेशन एजन्सीने निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे झाली आहे.
अभिजित यांनी लिहिले, “मी माझी कंपनी विकली आहे कारण मला या महिन्याच्या अखेरीस देश सोडण्यास भाग पाडले जात आहे. मी स्वेच्छेने स्वीडन सोडत नाही, तर एका अकार्यक्षम आणि प्रतिकूल सरकारी यंत्रणेने केलेली ही हकालपट्टी आहे.”
अभिजित नाग बालसुब्रमण्यम यांनी मे २०२५ मध्ये हायड्रो स्पेस स्वीडन एबी नावाच्या कंपनीची स्थापना केली होती. स्वीडनमधील स्लेफ्टिया शहरात सुरू झालेली ही मायक्रोग्रीन्स कंपनी प्रचंड यशस्वी ठरली होती आणि ग्राहकांकडूनही तिला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता.
या व्यवसायाचा मुख्य उद्देश उत्तर स्वीडनमधील स्थानिक अन्न सुरक्षा अधिक बळकट करणे हा होता. मात्र, एकीकडे व्यवसायाने गती पकडलेली असताना दुसरीकडे त्यांच्या इमिग्रेशन प्रकरणाचा गुंता वाढत चालला होता.
अभिजित यांनी म्हटले, “या बदल्यात मला स्वीडिश मायग्रेशन एजन्सीकडून पारदर्शकतेचा आणि मानवी सौजन्याचा पूर्णपणे अभाव पाहायला मिळाला.”
अलिकडच्या वर्षांत स्वीडनने जागतिक प्रतिभेसाठी खुले असलेले ‘इनोव्हेशन हब’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र, अभिजित यांच्या मते त्यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय संस्थापकांबद्दलच्या वाढत्या प्रतिकूल वातावरणावर प्रकाश टाकते. “स्वीडनची ‘स्टार्टअप फ्रेंडली’ प्रतिमा ही केवळ एक मुखवटा आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.

स्वीडनची इमिग्रेशन व्यवस्था अक्षम असल्याचा आरोप करत या उद्योजकाने म्हटले की, त्यांचे प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांकडे “शून्य व्यावसायिक समज” होती. त्यांनी कागदपत्रांच्या प्रक्रियेबद्दल स्पष्ट मार्गदर्शन केले नाही आणि नाकारण्याची कारणे आपल्या इच्छेनुसार बदलली.
“स्वीडिश मायग्रेशन एजन्सीसोबतचा माझा अनुभव केवळ एक नोकरशाहीतील अडथळा नव्हता, तर तो प्रशासकीय विस्कळीतपणा आणि अव्यावसायिकतेचा एक नमुना होता”, असे त्यांनी पुढे लिंक्डइनवर लिहिले.
अभिजित यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा त्यांच्यावर झालेला भावनिक परिणामाबद्दलही उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले की, या अनिश्चिततेने त्यांचे मानसिक आरोग्य “उद्ध्वस्त” केले, ज्यामुळे त्यांना कामातून ब्रेक घेऊन भारतात परत यावे लागले.
“जी व्यवस्था मुळातच कोलमडलेली आहे आणि वरवर परदेशी व्यक्तींबद्दल द्वेष बाळगणारी वाटते, तिच्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी माझ्याकडे ऊर्जा किंवा इच्छा उरलेली नाही”, असे अभिजित यांनी पोस्टच्या शेवटी लिहिले.

