Better Home CEO Vishal Garg lost job: एका झूम कॉलवर तब्बल ९०० कर्मचाऱ्यांना एका झटक्यात कामावरून काढून टाकल्यानंतर जगभरात चर्चेत आलेले भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग यांना अखेर स्वतःची नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. बेटर होम अँड फायनान्स या कंपनीच्या संचालक मंडळाने गर्ग यांची सीईओ पदावरून उचलबांगडी केली असून डॅनियल लुईस यांच्याकडे कंपनीची धुरा सोपवली आहे. विशाल गर्ग यांना नोकरीवरून काढल्यानंतर त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा होत असून ‘कर्माचे फळ भोगावे लागत आहे’, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.

संचालक मंडळात नुकताच समावेश झालेल्या डॅनियल लुईस यांनीच आपला विश्वासघात करून आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याचा आरोप विशाल गर्ग यांनी केला आहे. ३ ऑगस्ट रोजी संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. अवघ्या आठवड्याभरापूर्वी संचालक मंडळात आलेल्या व्यक्तीने इतर संचालकांना आपल्या बाजूने वळवत हा कट रचल्याचा दावा विशाल गर्ग यांनी सीएनएनशी बोलताना केला.

विश्वासघाताचा आरोप

विशाल गर्ग म्हणाले, “डॅनियलने माझी दिशाबूल केली. त्याने सुरुवातीला कंपनीच्या रणनीतीचे कौतुक केले. सोशल मीडियावर आमची पाठराखण केली आणि त्या माध्यमातून संचालक मंडळात जागा मिळवली. त्यानंतर त्याने थेट माझ्याच पाठीत खंजीर खुपसला.”

उंच भरारी आणि उतरती कळा

बेटर होम अँड फायनान्स कंपनीने करोना काळात उंच भरारी घेतली. करोना महामारीत कमी व्याजदरांमुळे कंपनीचा गृहकर्ज पुनर्वित (Refinancing) व्यवसाय प्रचंड तेजीत आला होता. एकेकाळी कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ८ अब्ज डॉलर्सवर (सुमारे ६६ हजार कोटी रुपये) पोहोचले होते. मात्र व्याजदर वाढल्यानंतर कंपनीचा व्यवसाय कोलमडला. २०२१ मध्ये १.५ अब्ज डॉलर्सवर असलेली कंपनीची वार्षिक उलाढाल २०२३ पर्यंत घसरून अवघ्या ७ कोटी डॉलर्सवर आली. सध्या कंपनीचे बाजारमूल्य घसरून केवळ ३० कोटी डॉलर्सच्या घरात उरले आहे.

झूम कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ

२०२१ मध्ये कंपनीचा कर्मचारी कपात करण्याच निर्णय वादग्रस्त ठरला. गैरव्यवहाराचे आरोप झाले. अमेरिकन वित्तीय नियामक यंत्रणेने चौकशी केली. २०२३ मध्ये शेअर बाजारातील नोंदणीनंतर समभागांमध्ये ९३ टक्क्यांची घसरण झाली. गर्ग यांनी झूम कॉलवरूनच ९०० कर्मचाऱ्यांची गच्छंती केली. या सर्व घडामोडींमुळे कंपनीची प्रतिमा डागाळली.

एआय तंत्रज्ञानाच्या जोरावर कंपनी पुन्हा एकदा नफ्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असतानाच आपल्याला हटविण्यात आल्याचा दावा गर्ग यांनी केला आहे. ओपनएआय, कॉइनबेससारख्या आघाडीच्या कंपन्यांबरोबर भागीदारी अंतिम टप्प्यात असतानाच कंपनीने आपल्याला धक्का दिल्याचा आरोप गर्ग यांनी केला.

दरम्यान गर्ग यांनी कंपनीच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी प्रसिद्ध वकील ॲलेक्स स्पिरो यांची नियुक्ती करत कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल गर्ग यांनी सीएनएनशी बोलताना म्हटले की, मी १० वर्षांपासून हे काम करत आहे. माझे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मला आशा आहे की, हा प्रश्न लवकर सुटेल. संचालक मंडळाने पुन्हा कामावर घ्यावे, अशी विनंती मी करत आहे.

“जोपर्यंत कंपनी पुन्हा नफ्यात येत नाही, तोवर वार्षिक अवघ्या एक डॉलर इतक्या मानधनावर काम करण्यास तयार आहे”, असेही गर्ग म्हणाले.