RBI Governor Sanjay Malhotra On Rupee Fall: आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रुपयाच्या अवमूल्यनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही, असे म्हटले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मल्होत्रा म्हणाले की, रुपयाच्या अवमूल्यनाची पातळी गेल्या १०-२० वर्षांतील पातळीपेक्षा वेगळी नसेल अशी त्यांना अपेक्षा आहे. गेल्या १० वर्षांत रुपयाचे दरवर्षी सुमारे ३ टक्के आणि गेल्या २० वर्षांत सुमारे ३.४ टक्के अवमूल्यन झाले आहे.

या वर्षी, अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे, विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेल्या गुंतवणुकीमुळे आणि भारत-अमेरिका व्यापार करारातील अनिश्चिततेमुळे भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. १६ डिसेंबर रोजी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.१६ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला होता. २०२५ मध्ये आतापर्यंत रुपयाचे मूल्य ४.६८% नी घसरले आहे, ज्यामुळे रुपया आशियाई चलनांमध्ये सर्वात खराब कामगिरी करणारे चलन ठरले आहे.

रुपयाच्या घसरणीमागील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे, देशांतर्गत महागाई कमी असल्यामुळे भारतीय रिझर्व बँकेने पूर्वीच्या तुलनेत कमी आक्रमक हस्तक्षेप धोरण अवलंबले आहे, असे म्हटले जाते.

रुपयाची घसरण रोखण्यासाठी परकीय चलन बाजारात आरबीआयच्या हस्तक्षेपाच्या धोरणाबद्दल बोलताना मल्होत्रा म्हणाले की, रिझर्व बँक इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची योग्य पातळी बाजारातील विविध घटकांना ठरवू देते.

“कोणत्याही प्रकारची अवाजवी, अतिरिक्त किंवा असामान्य अस्थिरता किंवा किमतींमध्ये निर्माण होणारी अनावश्यक सट्टेबाजी रोखणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशा वेळीच आम्ही हस्तक्षेप करतो”, असे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची आजची कामगिरी

एका आठवड्याच्या चढ-उतारानंतर, भारतीय रुपया सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८९.५४ वर उघडला, जो शुक्रवारच्या ८९.२७ च्या बंद झालेल्या भावापेक्षा ०.३% नी कमी होता. गेल्या आठवड्यात, १६ डिसेंबर २०२५ रोजी, रुपयाने ९१ ची ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गाठली होती.

ही पातळी ओलांडल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत, रुपयामध्ये जवळपास २% नी वाढ झाली आहे. या क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले की, ही सुधारणा मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे झाली आहे, ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीने आक्रमकपणे डॉलरची विक्री केली.