Indian Rupee Hits Historic Low 91.05: भारतीय रुपया मंगळवारी (१६ डिसेंबर) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९१.०५ या त्याच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. भारत-अमेरिका व्यापार करारात कोणतीही प्रगती न झाल्याने आणि परकीय भांडवलाचा सततचा प्रवाह यामुळे ही घसरण झाली आहे.
सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९०.७८ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.०३ टक्क्यांनी घसरून ९८.२७ वर आला आहे.
भारत-अमेरिका व्यापार करारात प्रगतीचा अभाव
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले होते की, भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार कराराला अंतिम रूप देण्यात येत आहे. ज्यामुळे उच्च टॅरिफ कमी होण्यास मदत होईल, तरीही व्यापार कराराच्या अंतिम स्वरूपाबाबत अनिश्चितता अजूनही कायम आहे.
चलन तज्ञांच्या मते, व्यापार करारात झालेल्या विलंबामुळे बाजारातील भावना कमकुवत झाल्या आहेत. एका बँकरने फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले की, “परकीय भांडवल बाहेर पडणे आणि अमेरिकेच्या ५० टॅरिफ टॅरिफ आकारणीमुळे, पुढील दोन तिमाहीत रुपया ९३ पर्यंत घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
सीएसबी बँकेचे ट्रेझरी प्रमुख आलोक सिंग म्हणाले की, “जर भारत-अमेरिका व्यापार करार जाहीर झाला किंवा भांडवली बाजारात नवीन गुंतवणूक आली, तरच रुपयाची घसरण थांबेल.”
डॉलरची मागणी आणि पुरवठा
रॉयटर्सच्या अहवालानुसार, डॉलरची मागणी आणि पुरवठा यांच्यात सतत तफावत आहे. डॉलर खरेदी नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड मार्केटमधील पोझिशन्सच्या संभाव्य मॅच्युरीटीशी संबंधित आहे.
बाजारीतील परकीय गुंतवणूक कमी होणे
१५ डिसेंबर रोजी तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एनएसईवरील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय बाजारात १,४६८ कोटी रुपये किमतीच्या इक्विटीचे निव्वळ विक्रेते होते, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,७९२ कोटी रुपये किमतीच्या इक्विटी खरेदी केल्या.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटीमधून १.५ अब्ज डॉलर्स गुंतवणूक काढून घेतली आहे. याव्यतिरिक्त, क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, डेट बाजारातून ८,८४६ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे.
रुपयाची कमकुवतता प्रामुख्याने आर्थिक मूलभूत घटकांमधील बिघाडामुळे नाही, तर टॅरिफ संबंधित चिंता आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे आहे.
