Induction cooktop demand rises due to LPG gas shortage in India: इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात मध्य पूर्वेत लष्करी संघर्ष सुरू आहे. यामुळे कच्च्या तेलासह जगभरातील गॅस पुरवठाही विस्कळीत झाला आहे. हा संघर्ष आणखी वाढल्यास एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक पर्यायी व्यवस्था शोधत असून, देशभरातील अनेक मेट्रो शहरांमध्ये इंडक्शन कुकटॉप्सचा साठा संपला आहे.
ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्टसारख्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये इंडक्शन स्टोव्हचे विविध मॉडेल्स ‘ऑउट ऑफ स्टॉक’ किंवा ‘सोल्ड आउट’ दाखवले जात आहेत.
हा ट्रेंड प्रामुख्याने अशा शहरांमध्ये अधिक दिसून येत आहे, जेथे नागरिक मोठ्या प्रमाणावर लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) वर अवलंबून आहेत.
याउलट, ग्रेटर नोएडा सारख्या ठिकाणी, जिथे घरे पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) ने जोडलेली आहेत, तिथे ग्राहकांना अद्याप याचा थेट फटका जाणवलेला नाही. त्यामुळे या भागात इंडक्शन स्टोव्ह अजूनही उपलब्ध आहेत.
बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरांतील रेस्टॉरंट्सनी गॅस पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास कामकाजात व्यत्यय येण्याचा इशारा दिल्यानंतर ही परिस्थिती समोर आली आहे.
गूगल ट्रेंड्सनुसार, गेल्या दोन दिवसांत भारतात ‘इंडक्शन कुकटॉप’ (Induction Cooktop) या शब्दाच्या सर्चमध्ये मोठी वाढ झाली आहे. यावरून असे दिसून येते की विजेवर चालणाऱ्या स्वयंपाकाच्या पर्यायांबाबत ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आणि गरज निर्माण झाली आहे.
ग्राहक इंटरनेटवर पिजन, फिलिप्स आणि प्रेस्टीज यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे इंडक्शन स्टोव्ह मोठ्या प्रमाणात शोधत आहेत. यावरून असे सूचित होते की ग्राहक खरेदी करण्यापूर्वी विविध ब्रँड्सच्या उत्पादनांची तुलना करत आहेत. काही लोकांनी ‘बेस्ट इंडक्शन’ आणि ‘एलपीजी संकट’ संबंधित माहितीही शोधली आहे, जी इंडक्शन कुकटॉप्सचा साठा संपण्याच्या सध्याच्या ट्रेंडशी सुसंगत आहे.
भारतातील स्वयंपाकघरे आजही मोठ्या प्रमाणावर एलपीजीवर अवलंबून आहेत. पण जेव्हा एलपीजी पुरवठ्यात व्यत्यय येतो किंवा सिलिंडर मिळण्यास उशीर होतो, तेव्हा लोक इंडक्शन कुकटॉप्ससारख्या पर्यायांकडे वळतात.
“इंडक्शन हे आता केवळ विद्यार्थी किंवा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांकडून वापरले जाणारे मर्यादित उपकरण राहिलेले नाही. गेल्या दशकात ते अनेक शहरी घरांमध्ये स्वयंपाकाचे पर्यायी साधन बनले आहे”, असे वंडरशेफचे सीईओ आणि संस्थापक रवी सक्सेना यांनी सांगितल्याचा उल्लेख मिंट संकेतस्थळाच्या वृत्तात आहे.
