मुंबई: जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत महागाईचा पारा तीव्रतेने चढत जाण्याची शक्यता ‘एसबीआय रिसर्च’ने जाहीर केलेल्या पूर्व-पतधोरण अहवालात व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून ५.६५ टक्क्यांवर पोहोचेल, तर ऐन सणासुदीत म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हा दर ६.५ टक्क्यांची मजल गाठेल, असाही अहवालाचा इशारा आहे.
वाढती महागाई, जागतिक आव्हाने आणि रुपयावर असलेला ताण यांमुळे रिझर्व्ह बँक येत्या आठवड्यात ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात किमान २५ आधार बिंदूंची (पाव टक्का) वाढ करेल, असा अंदाज देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी या अहवालातून वर्तवला आहे. म्हणजे सध्या ५.२५ टक्के असलेला रेपो दर लवकरच ५.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.
या आधी ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून ४.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, नवीन आधारभूत वर्षानुसार मालिकेत महागाई मोजण्यासाठी गृहीत धरल्या जाणाऱ्या वस्तूंची व्याप्ती वाढली आहे. जानेवारीत केवळ २२ वस्तूंमुळे ९० टक्के महागाई ठरत होती, ती संख्या ऑगस्टमध्ये वाढून ५१ वर पोहोचली आहे. म्हणजेच महागाईचे मापन अधिक सर्वसमावेशक बनले आहे.
यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ८७ टक्क्यांवर राहिला असून, देशातील ४३ टक्के जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडला आहे. एल निनोची तीव्र स्थिती आणि ऑक्टोबरमधील कमी पाऊस यामुळे रबी पिकांवर आणि पर्यायाने अन्नधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती अहवालाने व्यक्त केली आहे.
‘जीडीपी’ वाढीच्या अंदाजात कपात शक्य
मजबूत अमेरिकन डॉलर, जागतिक तेल भडक्याने तेल कंपन्यांची परकीय चलनाची वाढलेली मागणी आणि परकीय गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सततची विक्री यांमुळे रुपयावर मोठा ताण आला आहे. या सर्व आव्हानांचा विचार करता ‘एसबीआय रिसर्च’च्या मते, रिझर्व्ह बँकेकडून यंदाच्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२७ साठीचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा अंदाज ३० आधार बिंदूंनी (०.३० टक्के) आणि महागाईचा अंदाज २० आधार बिंदूंनी (०.२० टक्के) वाढवण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईला लगाम घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आजवर रेटलेली ‘तटस्थ’ धोरणाची भूमिकाही बाजूला सारून व्याजदर वाढवण्याच्या दिशेने पाऊल टाकावे लागू शकते.
