Intel Lay off 15000 Employees : जगातील सर्वात मोठी चिपमेकर कंपनी इंटेलने त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने मोठ्या नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या शेअर्सची मोठी घसरण आणि या तिमाहित झालेला तोटा पाहून कंपनीने खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. इंटेलने गुरुवारी (१ ऑगस्ट) एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की ते त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहेत. इंटेलमध्ये तब्बल १.१ लाख कर्मचारी काम करतात. याचाच अर्थ ते १५ ते १६,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहेत.
इंटेलने म्हटलं आहे की त्यांना Nvidia व AMD सारख्या स्पर्धकांशी दोन हात करायचे आहेत. त्यामुळे कंपनीला काही बदल करण्याची आवश्यकता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत इंटेल ही कंपनी Nvidia व AMD च्या मागे पडत चालली आहे. बाजारात याचा परिणाम दिसू लागला आहे. परिणामी कंपनीला काही टोकाचे निर्णय घ्यावे लागत आहेत.
नोकरकपातीचं कारण काय?
इंटेल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट जेल्सिंगर यांनी गुरुवारी कर्मचाऱ्यांना एक संदेश जारी केला आहे. यात त्यांन म्हटलं आहे की कंपनीने पुढील वर्षी १० अब्ज डॉलर्सची बचत करण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत आपण काही कर्मचाऱ्यांची कपात करणार आहोत. आपण १५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहोत. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही नोकरकपात पूर्ण केली जाईल.
हे ही वाचा >> Gold-Silver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आले पुन्हा रंगात, चांदीची पण उंच उडी, सराफा बाजारात १० ग्रॅमची किंमत किती?
पॅट जेल्सिंगर म्हणाले, आपण आपल्या खर्चाची संरचना नवीन ऑपरेटिंग मॉडेलशी जुळवून घ्यावी लागेल. आपली काम करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपलं उत्पन्न अपेक्षेप्रमाणे वाढलं नाही. आपण अद्याप एआय सारख्या शक्तीशाली ट्रेंडचा फायदा करून घेऊ शकलो नाही. आपला खर्च खूप आहे आणि नफ्याचं मार्जिन कमी झालं आहे.
हे ही वाचा >> इन्फोसिसला ३२,००० कोटी ‘जीएसटी’ भरण्याची नोटीस, जुलै २०१७ ते २०२२ कालावधीसाठी कर चुकवल्याचा आरोप
यापूर्वी ५ टक्के नोकरकपात
यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये इंटेलने नोकरकपात केली होती. तेव्हा कंपनीने ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं होतं. कंपनीने कर्मचारी कपातीसह इतर अनेक प्रकारचे खर्च बंद केले आहेत, तर काही खर्च कमी केले आहेत. कंपनीतील सुविधांवरही याचा परिणाम होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd