नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती भडकलेल्या असतानाही देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची विक्री पडत्या दराने करावी लागल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना ३० जूनपर्यंत ७४,७८१ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुरुवारी दिली.
अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमती १३० डॉलर प्रतिपिंपापुढे पोहोचल्या होत्या. मात्र असे असूनही देशांतर्गत सरकारी तेल वितरण कंपन्यांनी या काळात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची विक्री उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने केल्यामुळे तोटा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या दरात तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता तूर्तास धूसर असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती आता कमी झाल्या असल्या, तरी कंपन्यांकडून संकटकाळात उच्च दराने खरेदी करण्यात आलेल्या तेलावर त्या प्रक्रिया करणे सुरू आहे. तेल कंपन्या साधारणपणे इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, म्हणजेच खनिज तेल, किमान दोन महिने आधीच खरेदी करतात. त्यामुळे सध्या ज्या खनिज तेलावर प्रक्रिया केली जात आहे, ते प्रामुख्याने एप्रिल किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला खरेदी केलेले आहे; त्या काळात आंतरराष्ट्रीय किमती खूप जास्त होत्या.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या जातील का, या प्रश्नावर पुरी म्हणाले की, जर पुढील काही आठवडे तेलाच्या किमती कमी राहिल्या, तरच हा प्रश्न विचारणे सयुक्तिक ठरेल. संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात करार झाल्यानंतर, जागतिक पातळीवर जूनच्या उत्तरार्धातच खनिज तेलाच्या किमती कमी होण्यास सुरुवात झाली.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांनी पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून खनिज तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक वाढ होऊनही किरकोळ किमती न वाढवता पेट्रोल, डिझेल, एलपीजी, एव्हिएशन टर्बाइन इंधन आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांचा अखंड पुरवठा कायम ठेवला होता.
भारताच्या बहुतांश ऊर्जा आयातीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक युद्धामुळे विस्कळीत झाल्यानंतर, जगभरातील तेल आयातदार देशांनी घाबरून केलेल्या खरेदीमुळे मागणीत मोठी वाढ झाली.
खनिज तेल पुन्हा ७० डॉलरवर
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले करण्यापूर्वी, खनिज तेलाचे दर प्रतिपिंप ७२ अमेरिकी डॉलरच्या आसपास होते. त्यानंतर संघर्ष वाढल्याने आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीचा धोका वाढल्याने किमती वाढल्या. युद्धामुळे तणाव शिगेला पोहोचला असताना, इराणने प्रत्युत्तर म्हणून सामुद्रधुनी बंद केल्यामुळे खनिज तेलाच्या किमतीत प्रतिपिंप १४४ अमेरिकी डॉलरपर्यंत वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा त्या प्रतिपिंप ७० अमेरिकी डॉलरपर्यंत थंडावल्या आहेत.
