Indian Oil Corporation Q2 Results : खनिज तेलाच्या शुद्धीकरणातून मिळालेल्या वाढीव नफ्यामुळे सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत २१,६३०.०३ कोटी रुपयांच्या विक्रमी नफ्याची नोंद केली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा ७,६१०.४५ कोटी रुपये होता. म्हणजेच वर्षभरात नफ्यात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे.

कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) १५.७१ रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ५.५३ रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला २,६६१.३७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी लक्षणीय ठरली आहे. आयओसीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये नोंदवलेल्या कंपनीच्या ३९,६१९ कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक वार्षिक नफ्याच्या निम्म्याहून अधिक नफा कंपनीने एका तिमाहीत मिळविला आहे.

खनिज तेलाचे पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांमध्ये रूपांतर करताना मिळणाऱ्या शुद्धीकरण नफ्यात (ग्रॉस रिफायनिंग मार्जिन) झालेल्या सुधारणेमुळे कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीत होणारा तोटा तसेच एलपीजीवरील अनुदानाचा आर्थिक भार यावर या वाढीव नफ्यामुळे काही प्रमाणात मात करता आली.

मात्र, कंपनीने सप्टेंबर तिमाहीसाठी किंवा आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी सकल शुद्धीकरण नफ्याची (जीआरएम) आकडेवारी जाहीर केलेली नाही. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, जूनच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत तेलाच्या किमतींमध्ये झालेली तात्पुरती घट तसेच पेट्रोकेमिकल आणि गॅस व्यवसायातील चांगल्या नफ्यामुळे तिमाहीतील कमाईला बळ मिळाले.

पुढील तिमाहीत नफ्यावर दबावाची शक्यता

पश्चिम आशियातील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर खनिज तेलाच्या किमती कमी झाल्यास साठ्यातील तेलाच्या मूल्यांकनामुळे (इन्व्हेंटरी लॉसेस) आगामी तिमाहींमध्ये कंपनीच्या नफ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा इशाराही आयओसीने दिला आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या पंपावरील किमती मे महिन्याच्या उत्तरार्धापासून स्थिर आहेत. या काळात तेलाच्या किमती वाढल्याने किरकोळ विक्रीत कंपनीला तोटा सहन करावा लागला. तसेच तिमाहीत एलपीजी अनुदानापोटी कंपनीवर ३२,५०५.६९ कोटी रुपयांचा थकीत भार होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीने १८,९६८.६६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. मागील वर्षी याच कालावधीत तो १३,२९९.०५ कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा परिचालन महसूल वाढून २.६३ लाख कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच तिमाहीत तो २.०३ लाख कोटी रुपये होता.