IPL Final 2026: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (३१ मे, २०२६) यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आधीच अंतिम फेरी गाठली असून, गुजरात आणि राजस्थान यांच्यातील ‘क्वालिफायर २’ चा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत बंगळुरूशी भिडेल. ज्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना होणार आहे, त्याची प्रेक्षक क्षमता १,३२,००० असून या सर्व तिकिटांची विक्री झाली आहे. त्यामुळे सामन्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादला जाणाऱ्या विमानांची तिकिटे आणि स्टेडियमच्या परिसरातील हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत.
विमान भाडे २६६ टक्क्यांनी वाढले
ट्रॅव्हल क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली-अहमदाबाद आणि बंगळुरू-अहमदाबाद यांसारख्या प्रमुख मार्गांवरील विमानभाडे दुप्पट झाले आहे. ‘कब्रा ट्रॅव्हल सर्व्हिसेस’चे व्यवस्थापकीय भागीदार राजा शर्मा यांनी सांगितले की, सामन्याच्या वेळेच्या आसपास असलेल्या विमानांमधील ‘प्रीमियम इकॉनॉमी’ आणि ‘बिझनेस क्लास’च्या जागा अनेक मार्गांवर आधीच आरक्षित (बुक) झाल्या आहेत. याबाबत फायनान्शियल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
शर्मा यांनी पुढे सांगितले की, काही विमानांमध्ये बंगळुरू-अहमदाबाद विमान प्रवासाचे भाडे २२ हजारांहून जास्त आकारले जात आहे, जे सहसा ६,००० ते ८,००० रुपयांच्या दरम्यान असते.
हॉटेल खोल्यांचे दर १४ हाजारांच्या पुढे
अहमदाबाद आणि गांधीनगर येथील हॉटेल्सनाही सध्या प्रचंड मागणी असल्याचे दिसून येत आहे. ‘द लीला, गांधीनगर’ हॉटेलचे महाव्यवस्थापक विकास सूद यांनी सांगितले की, हॉटेलपासून सुमारे २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टेडियमकडे जाणाऱ्या ग्राहकांसाठी हॉटेलतर्फे वाहतूक सेवा पुरवली जाईल. या हॉटेलमधील खोल्यांचे दर प्रति रात्र साधारणपणे १४,००० रुपयांपासून सुरू होतात.
अहमदाबाद येथील ‘द फोरम हॉटेल’चे उपाध्यक्ष (ऑपरेशन्स), विकास खजांची यांनी सांगितले की, त्यांचे हॉटेल ‘डायनॅमिक प्राइसिंग’ (मागणीनुसार दरांमध्ये बदल करण्याची पद्धत) धोरणाचा अवलंब करते. तरीही दरांमधील वाढ ही एका मर्यादेतच राहील.
हॉटेल्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतिम सामन्याच्या दोन दिवस आधीच, ‘द लीला, गांधीनगर’ येथील सुमारे ८५% आणि ‘द फोरम हॉटेल’ येथील जवळपास ५०% खोल्यांचे आरक्षण (बुकिंग) पूर्ण झाले होते.
तिकिटांचा काळाबाजार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही आयपीएलच्या अंतिम सामन्याच्या तिकिटांच्या पुनर्विक्रीच्या ऑफर्सचा अक्षरशः पाऊस पडत असून, मूळ किमतीच्या जवळपास पाच पट दराने ही तिकिटे विकली जात असल्याचे वृत्त आहे. २०२२ आणि २०२५ मधील आयपीएल अंतिम सामन्यांपूर्वी, तसेच या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीही पोलिसांनी तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक केली होती.
