Iran Israel war impact on Dubai economy and global investors: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्षाची मध्य पूर्वेतील अनेक देशांना झळ बसत आहे. यावरून चीनच्या बीजिंगमधील शिक्षक झुएकिन जियांग यांनी दुबईच्या भविष्याबद्दल केलेली धाडसी भविष्यवाणी सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

जागतिक राजकारण आणि इतिहासाचे विश्लेषण करण्यासाठी ओळखले जाणारे चिनी शिक्षक, संशोधक आणि भाष्यकार झुएकिन जियांग यांनी अलीकडेच डायलॉग वर्क्स यूट्यूब चॅनेलवर एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला की दुबईची स्थिर जागतिक केंद्र म्हणून असलेली प्रतिमा या प्रदेशातील सध्याच्या भू-राजकीय तणावात टिकू शकणार नाही.

दुबईची प्रतिमा का खराब होऊ शकते?

मुलाखतीत बोलताना झुएकिन जियांग यांनी दावा केला की जागतिक गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित ठिकाण म्हणून दुबईची प्रतिष्ठा चालू संघर्षामुळे कायमची खराब होऊ शकते.

“हे सर्व काही केवळ एक मृगजळ होते. त्यांनी स्वतःची प्रतिमा एक सुरक्षित आणि संरक्षित ठिकाण म्हणून निर्माण करण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला आहे. त्यांनी जागतिक गुंतवणूकदारांसाठी असे ठिकाण निर्माण केले आहे जिथे तुम्हाला कर भरावा लागत नाही आणि तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. ‘तुमचे पैसे इथे गुंतवा’ असे त्यांनी आवाहन केले, पण बघा काय झाले, फक्त एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हे मृगजळ नष्ट केले आहे. आणि एकदा का मृगजळ नष्ट झाले की, ते पुन्हा कधीही परत येत नाही”, असे ते म्हणाले.

आखाती देशांमधील जागतिक गुंतवणूक बाहेर पडू शकते

ते पुढे म्हणाले, “पुढील काही आठवड्यांत जीसीसी (गल्फ कोऑपरेशन कौन्सिल) देशांमधून, विशेषतः संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक बाहेर पडेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. बहुतांश ‘इन्फ्लुएन्सर्स’ची दुबईमध्ये मालमत्ता आहे, त्यामुळे दुबई अजूनही चैतन्यमय आहे ही प्रतिमा टिकवून ठेवणे हे त्यांच्या स्वतःच्या हिताचे आहे. परंतु, एकदा का ही प्रतिमा डागाळली की ती पुन्हा सावरता येत नाही. मला वाटते हे सर्व आता संपले आहे. मला इथे कोणतेही भविष्य दिसत नाही.”

जियांग यांनी असा युक्तिवाद केला की दुबईचे जागतिक आकर्षण मुख्यत्वे जागतिक भांडवलासाठी एक सुरक्षित, करमुक्त आणि फायदेशीर ठिकाण आहे या कल्पनेवर आधारित आहे. त्यांच्या मते, प्रादेशिक संघर्षामुळे एकदा का या धारणेला तडा गेला, तर आखाती देशांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक बाहेर पडू शकते.