Iran War Impact on Dubai Real Estate Market: गेल्या तीन वर्षांपासून तेजीत असलेल्या दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्राने २०२६ च्या सुरुवातीलाही जोरदार गती पकडली होती, पण इराणमधील वाढता तणाव आणि मध्य पूर्वेतील अस्थिर वातावरणाचा अमिरातीच्या रिअल इस्टेट क्षेत्रावर परिणाम होत आहे. हे क्षेत्र अजूनही भक्कम असले तरी, भू-राजकीय तणावादरम्यान गुंतवणूकदारांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याने व्यवहार मंदावले आहेत.

खरेदीदारांच्या वर्तनात लक्षणीय बदल

खरेदीदारांच्या वर्तनात लक्षणीय बदल झाल्याचे आघाडीच्या ब्रोकर्सचे म्हणणे आहे. “आम्हाला घाबरण्यासारखे वातावरण दिसत नाहीये, पण ग्राहक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करत आहेत. माझ्या एका ग्राहकाने नुकतीच करारातून माघार घेतली आहे. परिस्थितीबाबत अधिक स्पष्टता येईपर्यंत अनेक ग्राहकांनी कराराच्या स्वाक्षऱ्या पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. याचबरोबर जानेवारीच्या तुलनेत साइट भेटी कमी झाल्या आहेत”, असे द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, दुबईतील एका आघाडीच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट फर्ममधील एका ब्रोकरने सांगितले.

जागतिक आणि प्रादेशिक अस्थिरतेचा परिणाम

दुबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील निवासी मालमत्ता विभाग हा विदेशी गुंतवणुकीशी मोठ्या प्रमाणात संबंधित आहे, ज्यामुळे जागतिक आणि प्रादेशिक अस्थिरतेचा या विभागावर मोठा परिणाम होऊ शकतो. काही व्यवहार निवडकपणे मागे घेतले गेल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जोपर्यंत हा संघर्ष लवकर निवळत नाही, तोपर्यंत मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होण्यास जास्त वेळ लागू शकतो. कारण गुंतवणूकदार आपली पुढील पावले अधिक काळजीपूर्वक उचलत आहेत, असा इशारा दलालांनी दिला आहे.

ग्राहकांवर भावनिक परिणाम

खरेदीदारांमध्ये संकोच असूनही, या उद्योगातील नेते यावर भर देतात की आतापर्यंतचा व्यत्यय पद्धतशीर नसून मानसिक आहे. “या टप्प्यावर, यूएई रिअल इस्टेट बाजारावरील परिणाम संरचनात्मक नसून भावनांमुळे झाला आहे. अमिरातीची वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था, मजबूत नियामक आराखडा आणि जागतिक भांडवलाचा सतत होणारा ओघ यामुळे या क्षेत्राला एक भक्कम आधार मिळत आहे”, असे निसस फायनान्सचे सीएमडी अमित गोएंका यांनी अहवालात म्हटले आहे.

२५ ते ३० टक्के वाटा हा भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीयांचा

विदेशी गुंतवणूकदारांची मोठी उपस्थिती पाहता हा लवचिकपणा विशेष लक्षणीय आहे. अहवालानुसार, बाजारपेठेतील आकडेवारी दर्शवते की, निवडक ‘मायक्रो-मार्केट्स’मधील विदेशी रहिवासी व्यवहारांपैकी सुमारे २५ ते ३० टक्के वाटा हा भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीयांचा आहे. हे आकडे दुबईच्या घरांच्या मागणीचे जागतिक स्वरूप अधोरेखित करतात.