मुंबई : केंद्र सरकारची नवरत्न प्राप्त दर्जा असलेली इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या (आयआरएफसी) आंशिक समभाग विक्रीकडे संस्थात्मक गुंतवणूकदारांनंतर आता किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांनी देखील पाठ फिरवल्याचे चित्र गुरुवारीही दिसून आले. आयआरएफसीच्या आंशिक समभाग विक्रीच्या (ओएफएस) अखेरच्या दिवशी देखील वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून निराशाजनक प्रतिसाद मिळाला.

गुरुवारच्या सत्रात आयआरएफसीचा समभाग हा ‘ओएफएस’साठी निश्चित करण्यात आलेल्या १०४.१२ या किमतीपेक्षा देखील खाली आल्याने गुंतवणूकदारांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. गुरुवारी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवलेल्या ३.७९ कोटींहून अधिक समभागांपैकी फक्त ५.९ लाख समभागांसाठी बोली लागली.

आयआरएफसीने ओएफएसच्या माध्यमातून संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी २३.५२ कोटी समभाग राखीव ठेवले होते. मात्र त्यांच्याकडून बुधवारी २२.३४ कोटी अर्थात राखीव हिस्स्यापैकी ९४.९८ टक्के समभागांची बोली लावण्यात आली. बुधवारी बाजारात तासांनंतर, अल्पप्रतिसाद बघता केंद्र सरकारने ‘ग्रीन-शू’ पर्यायाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी प्रतिसमभाग १०४.१२ रुपयांप्रमाणे बोली लावली. त्यातून २,३२६ कोटी रुपयांची निधी उभारणी झाली आहे. रेल्वे क्षेत्रातील या उपक्रमात सध्या सरकारचा ८६.३६ टक्के हिस्सा आहे.

गुरुवारच्या सत्राअखेर आयआरएफसीचा समभाग १.२७ टक्क्यांनी घसरून १०३.२३ रुपयांवर बंद झाला. समभागाने गुरुवारच्या सत्रात १०२.५४ या ५२ आठवड्यातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे १.३४ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.