IT Engineer Deloitte Resignation : देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. या विधानानंतर देशात वर्क लाईफ बॅलन्सवरुन मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला होता. मात्र, मूर्ती यांनी सांगितलेल्या ७० तासांपेक्षा जास्त तास काम करुनही पदरी निराशा पडल्याचे एका आयटी अभियंत्याने सांगितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. गेल्या १० वर्षांपासून कंपनीसाठी अहोरात्र काम करुनही केवळ ५% पगारवाढ झाल्याने हताश झालेल्या तरुणाने थेट नोकरीचा राजीनामा दिला आहे.
‘१० वर्षे एकाच कंपनीत राहण्याचा प्लॅन नव्हता, पण…’
‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, सल्लागार क्षेत्रातील ‘डेलॉईट’ या आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपनीत अर्जुन (नाव बदलेले) गेल्या १० वर्षांपासून काम करत होता. तो म्हणाला, आयटी व्यावसायिक दर दोन-तीन वर्षांनी चांगल्या पगारवाढीसाठी कंपन्या बदलतात. मात्र, मी जेव्हा कॉलेजमधून थेट डेलॉईटमध्ये रुजू झाला, तेव्हापासून इथेच आहे. माझे वरीष्ठ आणि मॅनेजरच्या जागी मीही कधीतरी जाईल, या विचाराने मी झोकून देऊन काम करत होतो.
‘फ्री वर्क’चा मानसिक तणाव
सल्लागार आणि आयटी क्षेत्रात केवळ क्लायंटचे काम करणे पुरेसे नाही, तर त्यासोबत कर्मचाऱ्यांवर इतर अनेक जबाबदाऱ्या लादल्या जातात, ज्याला अर्जुन ‘फ्री वर्क’ म्हणतो. यामुळे कामाचा अतिरिक्त ताण तुमच्यावर येतो. सुट्टीच्या दिवशीही तुमच्या मनात क्लायंटचाच विचार सुरू असतो.
अपार मेहनतीच्या बदल्यात ‘अल्प’ मोबदला
अर्जुनच्या मते, कामाचा ताण आणि कौटुंबिक आयुष्याचा त्याग करुनही जेव्हा पगारवाढीची वेळ येते, तेव्हा सर्वात मोठा भ्रमनिरास होतो. कंपनीसाठी दिवस-रात्र एक करून लाखो डॉलर्सचे प्रोजेक्ट्स आणणाऱ्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांना आणि सामान्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारवाढीत फारसा फरक नसतो. या वर्षी लोकांना ५ टक्क्यांपेक्षा कमी पगारवाढ मिळाली. जेव्हा तुम्ही अपार मेहनत करता आणि त्याचा योग्य सन्मान किंवा मोबदला मिळत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने बर्नआऊट सुरू होतो, असे अर्जुन म्हणतो.
पैशांपेक्षा वेळेचे स्वातंत्र्य महत्त्वाचे
वार्षिक ३५ लाख रुपयांचे पॅकेज असणाऱ्या अर्जुनला एवढी मेहनत घेऊनही ५ टक्के वाढ मिळाल्याने, त्याने निराश होऊन डेलॉईटचा राजीनामा दिला. आता हैदराबादमधीलच एका दुसऱ्या कंपनीत जॉईन केले असून, तिथे त्याला चांगला पगार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल’ साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे, असे तो म्हणतो. “२२व्या वर्षी माझ्यासाठी यशाची जी व्याख्या होती, ती ३५व्या वर्षी बदलली आहे. डेलॉईटमधील १० वर्षांचा मला कोणताही पश्चात्ताप नाही, कारण त्या अनुभवानेच मला आज योग्य निर्णय घेण्याचा आत्मविश्वास दिला आहे.”, असंही अर्जुनने म्हटलं आहे.
