IT Engineer High Salary Boredom : महिन्याला अडीच लाख पगार, कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम आणि दिवसातून फक्त २ ते ४ तासांचं काम, अशी नोकरी म्हणजे अनेकांचा ड्रीम जॉब आहे. पण, प्रत्यक्षात एका ३२ वर्षीय आयटी तरुणाला याच कामाचा वीट आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिएटवर त्याने आपला अनुभव शेअर केला आहे. या पोस्टवरुन आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. मानसिक समाधान की आर्थिक प्रगती हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

रेडिएटच्या ‘r/developersIndia’ या कम्युनिटीवर हा विषय शेअर करण्यात आला आहे. या इंजिनिअर तरुणाने पोस्टमध्ये म्हटलं की, त्याला कोडिंगची आवड असून, तांत्रिक कौशल्यामध्ये तो त्याच्या टीममध्ये सर्वोत्तम आहे. कंपनीची संस्कृती उत्तम आहे, बॉस चांगला आहे आणि कामाचा ताणही नाही. तरीही त्याला नोकरीत अजिबात रस उरलेला नाही.

Earning 2.5 Lakhs per month, I don't want to work at all
byu/Mircat_Trader_420 indevelopersIndia

आर्थिक प्रगती झाली, पण आनंद नाही

तरुणाने लिहिलंय, की गेल्या १० वर्षात मी स्वप्नवत प्रगती केली आहे. माझा सुरुवातीचा पगार ९,००० रुपये ते दरमहा अडीच लाखांवर पोहोचला आहे. नोकऱ्या बदलल्या, कामाची पद्धत बदलून पाहिली, पण मनातील ही पोकळी काही केल्या भरून निघत नाही. दिवसातून मोजकेच तास काम करावे लागत असल्याने याला थकवा किंवा बर्नआऊट म्हणता येणार नाही. मात्र, दर रविवारी रात्री ‘सोमवार कधीच उजाडू नये’ अशी भावना मनात येते. या तरुणाकडे सध्या सुमारे ६० लाखांचा लिक्विड फंड आहे. मात्र, वयाच्या ३२ व्या वर्षी ६० लाखांमध्ये निवृत्ती घेता येत नसल्याने नोकरी करत असल्याचं त्याने सांगितलं.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

या पोस्टवर हजारो युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरुणाला आपण समदुःखी असल्याचे म्हटलं आहे. तर काहींनी याचे मूळ मानवी स्वभावात असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले, “मानव हा स्क्रीनसमोर बसून तास न् तास काम करण्यासाठी बनलेलाच नाही. आपण शिकारी, भटकंती आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी बनलो आहोत. कॉर्पोरेट जगताची ही चौकट आपल्या नैसर्गिक जीवनशैलीच्या विरुद्ध आहे.”

आर्थिक आणि मानसिक कोंडी

आजच्या आयटी सेक्टरमध्ये पगाराचा आकडा कितीही मोठा असला, तरी अनेकांना अंतर्गत नैराश्य आल्याचे दिसून येत आहे, तर काही ठिकाणी काम आणि जीवनाचे संतुलन बिघडल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही वर्षात आयटी सोडून अनेकांनी गाव किंवा आपल्या आवडत्या क्षेत्रात काम सुरू केल्याच्या कहाण्या सोशल मीडियावर वाचायला मिळतात.